इंग्लंडचा दौरा सुरू झाल्यापासून भारताच्या मागे वाद-विवादांचा ससेमिरा लागलेला आहे. सुरूवातीला जेम्स अँडरसन आणि रवींद्र जडेजा प्रकरण, तर सध्या सुरू असलेला संघाचा सूत्रधार कोण आहे, यावरून सुरू झालेला वाद. पहिल्या वाद-विवादामुळे भारताला कसोटी मालिका तर गमवावी लागली, पण सध्याच्या वादाचा एकदिवसीय मालिकेवर परिणाम होऊ नये, अशीच अपेक्षा भारतीय चाहत्यांची असेल. त्यामुळे सारं काही विसरून भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरला, तर त्यांना नक्कीच विजय मिळवता येईल. दुसरीकडे विजयामध्ये सातत्य राखण्यास इंग्लंडचा संघ उत्सुक असेल. पहिला सामना पावसामुळे वाया गेल्याने आता साऱ्यांचेच लक्ष लागलेले आहे ते भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याकडे.
कसोटी मालिकेतील मानहानीकारक पराभव विसरून भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. संघातील खेळाडूंमध्येही काही बदल असल्याने वातावरण बदलण्याची शक्यता आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने चांगली कामगिरी केलेली आहे. कसोटी मालिकेमध्ये शिखर धवन, विराट कोहली, रोहित शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, रवींद्र जडेजा यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्यांच्यासाठी ही मालिका एक चांगली संधी असेल. कसोटी मालिकेत धोनी आणि अजिंक्य रहाणे हे दोनच फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये दिसले होते, त्यामुळे त्यांच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील. सुरेश रैनाने सामन्यापूर्वी जबरदस्त सराव केला असून त्याच्या बॅटीमधून किती धावा निघतात, याकडे साऱ्यांचेच लक्ष असेल. गोलंदाजीमध्ये मुंबईकर धवल कुलकर्णीला संभाव्य संघात स्थान दिले असले तरी त्याला या सामन्यात संधी मिळण्याबाबत साशंकता आहे.
कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर इंग्लंडचा संघ एकदिवसीय मालिकेतही विजयामध्ये सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक, मोइन अली, इयान बेल आणि सर्वात यशस्वी ठरलेला जेम्स अँडरसन यांच्याकडून इंग्लंडला मोठय़ा अपेक्षा असतील. इऑन मॉर्गन आणि जेम्स ट्रेडवेलसारखे एकदिवसीय क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणारे खेळाडू संघात असल्याने इंग्लंडचा संघ समतोल वाटत आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅमसन, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, करण शर्मा, मोहित शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, धवल कुलकर्णी आणि भुवनेश्वर कुमार.
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), मोइन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, इयान बेल, जोस बटलर (यष्टीरक्षक), स्टिव्हन फिन, हॅरी गुर्ने, अ‍ॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, इऑन मॉर्गन, जो रूट, बेन स्टोक्स, जेम्स ट्रेडवेल आणि ख्रिस वोक्स.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस वाहिनीवर.
वेळ : दु. ३ वा. पासून