विश्वचषक स्पर्धा २०१९ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचे आव्हान संपुष्टात आल्यापासून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. धोनीचे चाहते धोनीमध्ये अजूनही क्रिकेट शिल्लक आहे. त्याने इतक्यात निवृत्त होऊ नये, अशी मतं व्यक्त करत आहेत. पण धोनी मात्र विश्वचषकानंतर अद्याप क्रिकेटच्या मैदानावर उतरलेला नाही. IPL 2020 मध्ये धोनी आपल्या खेळीचा जलवा दाखवेल आणि झोकात टीम इंडियात पुनरागमन करेल अशाही चर्चा रंगल्या. पण दुर्दैवाने करोनामुळे IPL पुढे ढकलण्यात आले. अशा परिस्थितीत धोनी मैदानावर परतण्याऐवजी निवृत्ती जाहीर करणार अशी चर्चा पुन्हा रंगू लागली. ट्विटरवर #Dhoni Retires असा एक हॅशटॅगदेखील ट्रेंड झाल्यामुळे निवृत्तीची पुन्हा चर्चांना उधाण आले.

Dhoni Retires असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी हिने या केवळ अफवा असल्याचे सांगितले. त्यानंतर धोनीचे बालपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनीदेखील धोनीच्या निवृत्तीची शक्यता फेटाळून लावली. “धोनीसारखा खेळाडू हळूच एकेकाला फोन करून निवृत्तीची घोषणा करणाऱ्यातला नाही. कोणती गोष्ट कशी करावी ते त्याला नीट माहिती आहे. जेव्हा त्याला वाटेल की आता निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे, तेव्हा तो स्वत: BCCI ला कळवेल आणि नीट पत्रकार परिषद घेऊन घोषणा करेल. त्याची जबाबदारी नीट पार पाडण्यास तो समर्थ आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेताना त्याने जे केलं ते आपण पाहिलं आहे”, असे बॅनर्जी यांनी आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

“सोशल मीडियावर घडणाऱ्या चर्चा कोणीही फारशा गांभीर्याने घेऊ नका. अनेकदा खूप गोष्टी ट्रेंडमध्ये येतात, पण शेवटी त्या अफवा असल्याचं बऱ्याचदा समजतं. मला कळत नाही की लोकं धोनीच्या मागे का लागली आहेत? मी त्याला अगदी चांगल्या पद्धतीने ओळखतो. त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो स्वत: निवृत्ती जाहीर करेल. सध्या धोनी किती तंदुरूस्त आहे हे IPL मध्ये तुम्हाला कळेलच आणि मला विश्वास आहे की जरी टी २० विश्वचषक पुढच्या वर्षी खेळवण्यात आला तरीही तो खेळेल”, असे ते म्हणाले.