भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मंगळवारपासून अॅडलेड येथे सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळण्याची दाट शक्यता आहे. डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे गेले काही महिने धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. मात्र, आता तो पूर्ण तंदरूस्त झाला असून, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे.
फिलिप ह्युजेसच्या दुर्देवी मृत्यूमुळे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ब्रिस्बेन येथील पहिली कसोटी पुढे ढकलण्यात आली होती. जर ही कसोटी नियोजित वेळेत खेळली गेली असती, तर फिटनेसअभावी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्कप्रमाणे महेंद्रसिंग धोनीलाही या सामन्याला मुकावे लागले असते. मात्र, अतिरिक्त वेळ मिळाल्यामुळे धोनी भारतीय संघात पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. त्याने शनिवारी अॅडलेडच्या दिशेने प्रयाण केले असून, रविवारी तो भारतीय संघाबरोबर सराव करेल. परदेशी खेळपट्यांवर खेळण्याचा दीर्घ अनुभव असलेल्या कॅप्टन कुलच्या समावेशामुळे संघाला आणखी बळकटी आली आहे.