सामनानिश्चिती प्रकरणानंतर धोनीची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

नवी दिल्ली : २०१३मध्ये घडलेल्या सामनानिश्चिती प्रकरणामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला होता. हा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात खडतर आणि नैराश्यग्रस्त होता, असे चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगत ‘‘यात खेळाडूंची काय चूक होती?’’ असा सवालही विचारला आहे. सामनानिश्चिती प्रकरणानंतर धोनीने पहिल्यांदाच ‘रोअर ऑफ द लायन’ या माहितीपटाद्वारे आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.

सामनानिश्चिती प्रकरणात व्यवस्थापनाचा सहभाग असल्यामुळे चेन्नई सुपर किंग्सवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. याविषयी धोनी म्हणतो, ‘‘हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. २००७च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ साखळीतच गारद झाला होता, त्यानंतर पहिल्यांदाच मी इतका नैराश्यग्रस्त झालो होतो. २००७मध्ये आम्ही चांगले खेळलो नव्हतो, म्हणून आमच्यावर ती परिस्थिती ओढवली होती. पण २०१३च्या प्रकरणाला मात्र एक वेगळाच रंग चढला होता. प्रत्येक जण फक्त सामनानिश्चिती प्रकरणाबाबत बोलत होता. आम्हाला कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल, अशी खात्री होती. पण आमच्यावर दोन वर्षांचीच बंदी लादण्यात आल्यामुळे काय प्रतिक्रिया द्यावी, हेच कळत नव्हते.’’

‘‘आमच्या फ्रँचायझीकडूनच चूक झाली होती. पण यात खेळाडूंची काय चूक होती? आम्ही काय चूक केली, जेणेकरून त्याची शिक्षा आम्हाला भोगावी लागली. सामनानिश्चितीमध्ये माझेही नाव समाविष्ट आहे, अशी चर्चा होती. जर संघ या प्रकरणात सहभागी असेल तर माझाही त्यात सहभाग आहे, अशी चर्चा रंगत होती. क्रिकेटमध्ये कुणीही सामनानिश्चिती करू शकते. त्या वेळी कुणीही येऊन आम्हाला विचारले नाही की, तुम्ही काय करत आहात? या प्रकरणाला कसे सामोरे जात आहात? याविषयी मी खेळाडूंशीही बोललो नाही. कारण क्रिकेटविषयीच्या त्यांच्या प्रतिमेला तडा जाऊ नये, हीच माझी इच्छा होती,’’ असेही धोनीने सांगितले.

गुरुनाथबाबत अनभिज्ञ होतो!

‘बीसीसीआय’चे तत्कालीन अध्यक्ष आणि चेन्नई सुपर किंग्सचे मालक एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन याचा या प्रकरणात कितपत सहभाग होता, यावर धोनी म्हणाला की, ‘‘जेव्हा या प्रकरणात गुरुनाथचे नाव समोर आले, त्या वेळी तो संघाचा भाग आहे, हे सर्वानाच माहीत होते. पण तो मालक, संघ प्रमुख किंवा प्रोत्साहन देणारा यापैकी कोणत्या भूमिकेत होता, हेच मला माहीत नव्हते. गुरुनाथ हा संघाचा मालक आहे, असे आम्हाला फ्रँचायझींपैकी कुणीही सांगितले नाही. तो श्रीनिवासन यांचा जावई आहे, इतकेच आम्हाला माहीत होते.’’ सामनानिश्चिती प्रकरणी गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांच्यावरील सट्टेबाजीचे आरोप सिद्ध झाल्यामुळे जुलै २०१५मध्ये त्यांच्या चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.