कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर होणाऱया इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघाचा नेटमध्ये जोरदार सराव सुरू आहे. कसोटीनंतर एकदिवसीय मालिका देखील खिशात घातल्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ ट्वेन्टी-२० मालिकेत देखील विजयीरथ कायम राखण्यासाठी सज्ज झाला आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेट म्हटलं की अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजांचा कस लागतो. त्यात भारतातील खेळपट्ट्या फलंदाजीला पोषक असल्याने गोलंदाजांना डेथ ओव्हर्समध्ये खूप मेहनत घ्यावी लागते. फलंदाजाच्या मोठ्या फटक्यांना आळा घालण्यासाठी गोलंदाजाला अतिशय हुशारीने अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजी करावी लागते. ट्वेन्टी-२० क्रीडा प्रकारातील हीच नस ओळखून धोनीने भारतीय संघाचा यॉर्कर स्पेशलिस्ट गोलंदाज जसप्रित बुमराह याच्याकडून वेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करवून घेतली. धोनीने नेटमध्ये फलंदाजी करताना वाईडच्या लाईनवर एक चेंडू ठेवून त्या चेंडूच्या आत पण फलंदाजापासून थोडं दूर यॉर्कर टाकण्याचे आव्हान बुमराहला दिले. बुमराहने धोनीचे आव्हान स्विकारत त्यानुसार अचूक टप्प्यात गोलंदाजी देखील केली.

वाचा: ‘पैसे नकोत, पण संघात खेळायला घ्या’

अखेरच्या षटकामध्ये फलंदाजाच्या जवळ गोलंदाजी केली तर फलंदाजाला चौकार आणि षटकार खेचताना मदत होते. पण फलंदाजापासून थोडं दूर ऑफ साईड द ऑफ स्टंपच्या दिशेने यॉर्कर टाकल्यास फलंदाजाने मोठा फटका मारण्याची शक्यता कमी असते. त्यादृष्टीनेच बुमराहने नेटमध्ये यावेळी सराव केला. बुमराहच्या ऑफ साईड यॉर्करवस धोनी मोठे फटके लगावण्याऐवजी फ्लिक करताना दिसला. फलंदाजाने चौकार आणि षटकार खेचण्यापेक्षा केवळ फ्लिक करून एक धाव घेतली तर गोलंदाजला निश्चिंत राहता येते. धोनी आणि बुमराहच्या सरावाचा व्हिडिओ बीसीसीआयच्या ट्विटर हॅण्डलवर अपलोड करण्यात आला असून धोनीने बुमराहला दिलेले आव्हान, असे कॅप्शन दिले आहे. धोनीने बुमराहच्या सुरूवातीच्या चेंडूंवर संयमी फटके खेळले पण धोनी म्हटलं की मोठे फटके नाहीत, असं कधी होईल का? धोनीने नेटमध्ये काही मोठे फटके देखील केली.