यष्टिमागून प्रतिस्पर्धी फलंदाजाच्या हालचालींवर नजर ठेवून सहकारी गोलंदाजांना मार्गदर्शन करण्याची भूमिका धोनी उत्तमपणे वठवतो. विशेषतः फिरकी गोलंदाजांना धोनीचे मार्गदर्शन बहुपयोगी ठरल्याचे आपण कित्येकवेळा पाहिले आहे. मात्र, धोनीनं यष्टीमागून दिलेल्या बऱ्याच टिप्स अपयशी ठरतात असा खुलासा कुलदीप यादवनं केला आहे. कुलदीपच्या या वक्तव्यानंतर नेटीझनस्नी त्याच्यावर टीका केली आहे.

सोमवारी CEAT पुरस्कार वितरण सोहळ्यात फिरकीपटू कुलदीप यादवला outstanding performance of the year पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी धोनीबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना कुलदीप बोलत होता. तो म्हणाला, सामन्यादरम्यान धोनीला जास्त बोलणं आवडत नाही, ज्यावेळी माही भाईला गरज वाटते त्यावेळी यष्टीमागून टीप्स देत असतो. यष्टीमागून धोनी अनेकदा गोलंदाजांना मार्गदर्शन करत असतो. षटक सुरू असताना मध्येच तो आम्हाला काही टिप्स देतो. काहीवेळा त्या कामी येतात, पण अनेकदा त्या अपयशीही ठरतात. धोनीच्या टिप्स चुकीच्या ठरल्या तरीही माही भाईला आम्ही काही बोलू शकत नाही.  या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर धोनीच्या चाहत्यांनी कुलदीपला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.

२०१७ मध्ये कुलदीप यादवने एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं आहे. कुलदीपनं एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं होते त्यावेळी धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला १३ वर्षे झाली होती. धोनीच्या नेतृत्वात भारताने आयसीसीच्या प्रत्येक चषकांवर नाव कोरलं आहे.

चहल म्हणतोय..धोनीमुळे आमचा आत्मविश्वास उंचावला
धोनीच्या टीप्स बऱ्याचवेळा चुकीच्या ठरतात असे म्हणत कुलदीप टीकेचा धनी ठरला असतानाच चहलनं धोनीचे कौतुक केलं आहे. धोनीमुळं माझा आणि कुलदीपचा आत्मविश्वास वाढला. सुरूवातीला इतर गोलंदाजाप्रमाणे आम्ही गोलंदाजी करायचो. धोनीच्या मार्गदर्शनामुळे आमची बळी घेण्याची भूक वाढली. आम्ही प्रत्येक चेंडू बळी मिळवण्याच्याच उद्देशाने पेकू लागलोय, असे मत चहलने व्यक्त केले.