इंग्लंडमध्ये आयोजित २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेनंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाबाहेर आहे. तत्कालीन निवड समितीने धोनी आता पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक नसेल हे स्पष्ट केलं होतं. यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार की संघात पुनरागमन करणार अशा अनेक चर्चा सोशल मीडियावर, आजी-माजी खेळाडूंमध्ये सुरु होत्या. परंतू भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज आशिष नेहराच्या मते धोनीने भारतीय संघाकडून आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला आहे.

अवश्य पाहा – ७ एकराच्या जागेवर उभं आहे धोनीचं रांचीमधलं अलिशान फार्महाऊस

“जेवढी मला माहिती आहे त्यानुसार धोनीने भारताकडून आपला अखेरचा सामना खेळला आहे. धोनीला आता कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायची गरज नाहीये. त्याने अद्याप निवृत्तीची घोषणा केलेली नसल्यामुळे आपण आणि प्रसारमाध्यमं याबद्दल एवढी चर्चा करतोय. त्याच्या डोक्यात काय सुरु आहे हे तोच सांगू शकतो.” नेहरा Star Sports वाहिनीच्या Cricket Connected कार्यक्रमात बोलत होता.

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या मुद्दा आणि आयपीएल याचा काही संबंध नाही. जर तुम्ही निवड समितीत असाल, कर्णधार असाल किंवा प्रशिक्षक असा…धोनी खेळण्यास तयार असेल तर तो माझा पहिल्या पसंतीचा खेळाडू असेल. आपला अखेरचा सामना खेळत असतानाही तो मैदानात असेपर्यंत अनेकांना सामना भारत जिंकेल अशी आशा होती, पण जिकडे धोनी बाद झाला तिकडे ही आशा संपुष्टात आली. नेहरा धोनीच्या खेळाबद्दल बोलत होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुरावलेला धोनी आयपीएलच्या तेराव्या हंगामातून क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याची शक्यता आहे.