टीम इंडियाचा माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा गेले काही दिवस त्याच्या नव्या वाहनामुळे म्हणजेच नव्या कोऱ्या ट्रॅक्टरमुळे चर्चेत होता. CSK ने धोनीचा एक व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये धोनी आपल्या नव्या ट्रॅक्टरवर बसून फेरफटका मारण्याचा आनंद घेताना दिसला होता. धोनीने ट्रॅक्टर विकत घेतल्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिद्रा यांनी भन्नाट कमेंट करत धोनीची स्तुती केली होती. त्यानंतर आता धोनी एका नव्या विषयामुळे चर्चेत आला आहे. एका बेशुद्ध पडलेल्या पक्ष्याला मदतीचा हात दिल्याने धोनी कुटुंबाची सोशल मीडियावर स्तुती करण्यात येत आहे.

धोनीची मुलगी झिवा हिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट करण्यात आले आहे. त्यातील एका फोटोत पक्षी बेशुद्ध अवस्थेत आहे, दुसऱ्या एका फोटोत धोनी त्या पक्ष्याची मदत करत आहे, तिसऱ्या फोटोत झिवाचा त्या पक्ष्यासोबतचा फोटो आहे तर चौथ्या फोटोत तो पक्षी शुद्धीत आला असल्याचे दिसत आहे. या फोटोंसहित झिवाच्या अकाऊंटवरून या पक्ष्याबद्दलची एक छान गोष्टदेखील सांगण्यात आली आहे.

‘तो पक्षी धोनीच्या फार्महाऊसच्या आवारात बेशुद्ध अवस्थेत पडला होता. झिवाने त्या पक्ष्याची अवस्था पाहून धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांना बोलवले. धोनीने त्या पक्ष्याला हातात उचलून घेतले आणि पाणी पाजले. थोड्याच वेळात पक्ष्याने डोळे उघडले. या पक्ष्याचे नाव crimson-breasted Barbet (तांबट पक्षी) असं साक्षीने झिवाला सांगितले. त्यानंतर त्या पक्ष्याला पानांमध्ये ठेवण्यात आले होते, पण काही वेळातच पक्षी उडून गेला’, अशी एक छानशी गोष्ट झिवाच्या अकाऊंटवरून सांगण्यात आली.

दरम्यान, सध्या लॉकडाउनचा काळ असल्याने सर्व क्रिकेटपटू घरात आहे. धोनीदेखील आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा यांच्यासोबत आपल्या फार्महाऊसवर निवांत वेळ घालवत आहे.