अफाट गुणवत्ता अंगी असूनही बराच काळ भारतीय संघाबाहेर राहिलेला आंध्र प्रदेशचा फलंदाज अंबाती रायुडू सध्या सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत छाप पाडण्यासाठी सज्ज आहे. मात्र मंगळवारी होणाऱ्या हाँगकाँगविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी संघातील सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनीकडून शिकण्यासाठी व प्रेरणा घेण्यासाठी आतुर आहे, असे रायुडूने सांगितले.

कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचे यंदा आशियाई जेतेपद राखण्याकडे लक्ष असेल. याबाबत रायुडू म्हणाला, ‘‘साहजिकच कोहलीच्या नसण्याने संघाला त्याची उणीव नक्कीच जाणवेल. मात्र तरीही आमच्याकडे पर्यायी दर्जाचे फलंदाज उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे धोनीने जवळपास एक दशक भारतीय संघाचे नेतृत्वपद सांभाळले आहे आणि संघातील प्रत्येक खेळाडू कोणतीही समस्या आल्यास सर्वप्रथम त्याच्याकडेच जातो. धोनीने मला अनेकदा कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.’’

‘‘खरे सांगायचे तर मला मधल्या फळीत फलंदाजी करण्याची संधी मिळेल की नाही, याचा मी अद्याप विचारही केलेला नाही. मात्र माझ्यासाठी ही स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे आणि सामन्याचा विचार करून स्वत:वर दडपण टाकू इच्छित नाही,’’ असे रायुडूने सांगितले.