विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेचा ज्वर संपत नाही तोच क्रिकेट चाहत्यांना आयपीएल सामन्यांचे वेध लागले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघाच्या सरावाला त्यांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या सहभागामुळे वेग आला आहे.
पुण्याचा पहिला सामना मुंबई इंडियन्स संघाबरोबर नऊ एप्रिल रोजी मुंबईत होणार आहे. या सामन्यासाठी पुण्याच्या सरावास प्रारंभ झाला आहे. मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग व सहायक प्रशिक्षक हृषीकेश कानिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सराव सुरू आहे. आयपीएलचे सामने विद्युत प्रकाशझोतात होत असल्यामुळे पुण्याचाही सराव विद्युत प्रकाशझोतात सुरू आहे.
या स्पर्धेसाठी पुण्याच्या संघात असलेल्या परदेशी खेळाडूंचे अद्याप आगमन झालेले नाही. हे खेळाडू थेट मुंबईतच सामन्यापूर्वी दोन दिवस अगोदर येणार आहेत. तसेच संघातील अन्य काही भारतीय खेळाडूही थेट मुंबईतच येणार असल्याचे फ्लेमिंग यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, संघाचा खऱ्या अर्थाने एकत्रित सराव मुंबईतच सात एप्रिल रोजी सुरू होईल. अर्थात येथे धोनी याचे आगमन झाल्यामुळे संघातील अन्य खेळाडूंच्या उत्साहास उधाण आले आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांसाठी खेळपट्टी कशी पाहिजे याबाबत आम्ही संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आहे व त्यानुसार खेळपट्टी तयार केली जात आहे.

पुणे संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, फाफ डुप्लेसिस, स्टीव्हन स्मिथ, केविन पीटरसन, सौरभ तिवारी, इरफान पठाण, मिचेल मार्श, थिसारा परेरा, बाबा अपराजित, अंकित शर्मा, रजत भाटिया, अल्बी मोर्कल, अंकुश बेन्स, पीटर हँडस्कोम्ब, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, रुद्रप्रतापसिंग, अशोक दिंडा, स्कॉट बोलँड, ईश्वर पांडे, दीपक चहार, जसकरणसिंग, मुरुगन अश्विन, अ‍ॅडम झम्पा.