भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा जेव्हा आढावा घेतला जातो, तेव्हा त्यात एक गोष्ट नेहमी सांगितली जाते. ती गोष्ट म्हणजे ICC च्या तीन मोठ्या क्रिकेट स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा कर्णधार… त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ चा टी-२० विश्वचषक जिंकला, २०११ चा वन डे विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून भारतीय संघाला आज ७ वर्षे झाली.

आजच्या दिवशी म्हणजेच २३ जून २०१३ ला भारताने इंग्लंडचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपदाचा मान मिळवला. ही स्पर्धा जिंकताच धोनी ICC च्या तीन स्पर्धा जिंकणारा पहिला कर्णधार ठरला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ५० षटकांचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे २० षटकांचा करण्यात आला. अंतिम सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने २० षटकात ७ बाद १२९ धावांपर्यंत मजल मारली. त्या सामन्यात विराट कोहलीने भारताकडून सर्वाधिक ३४ चेंडूत ४३ धावा केल्या. त्यात ४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्यानंतर अखेरच्या काही षटकांमध्ये रवींद्र जाडेजाने मोठे फटके मारून ३३ धावांची भर घातली आणि संघाला १२९ धावांचा पल्ला गाठून दिला. इंग्लंडकडून रवि बोपाराने सर्वाधिक ३ गडी बाद केले.

भारताने दिलेल्या १३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान इंग्लंडने पहिल्या ८ षटकांमध्ये ४६ धावांत ४ गडी गमावले होते. अ‍ॅलिस्टर कुक, जोनाथन ट्रॉट, इयान बेल आणि जो रूट हे चार चांगल्या लयीत असलेले खेळाडू स्वस्तात माघारी परतले होते. पण त्यांनतर इयन मॉर्गन आणि रवि बोपाराने डाव सावरला. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी झाली. सामना जिंकण्यासाठी २० धावा हव्या असताना मॉर्गन (३३) आणि बोपारा (३०) दोघेही एकापाठोपाठ एक बाद झाले. त्यामुळे इंग्लंडला त्या सामन्यात ५ धावांनी पराभूत होत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

भारताच्या या विजयात मोलाचा वाटा उचलणारा रवींद्र जाडेजा सामनावीर ठरला, तर संपूर्ण स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करणारा शिखर धवन स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू निवडला गेला.