भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी एका ट्विटरवरील लाईकमुळे चांगलाच चर्चेत आलाय. धोनी फेसबुक आणि इन्टाग्रामवर सक्रिय असला तरी ट्विटरवर तो फारसा व्यक्त होत नाही. धोनीनं २००९ पासून ट्विटरवर सक्रिय झाला आहे. वाढत्या लोकप्रियतेसोबत गेल्या ८ वर्षांत ६.८ मिलीयन नेटकरी त्याला फॉलो करतात. धोनी ट्विटरवर फारसा व्यक्त होत नाही. पण नुकत्याच एका ट्विटला लाईक केल्यामुळे त्याला ट्रोलचा सामना करावा लागला.

२०१९ चा विश्वचषक भारतीय संघ जिंकेल, या आशयाचे ट्विट धोनीने लाईक केले होते. या ट्विटमध्ये सामना फिक्स आहे, असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे धोनीला नेटकऱ्यांनी ट्रोल केले. धोनीने आतापर्यंत केवळ दोन ट्विट लाईक केली होती. त्यानंतर आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर धोनीने लाईक केलेले हे तिसरे ट्विट त्याला चांगलेच महागात पडल्याचे दिसते.

सध्याच्या घडीला सोशल मीडियावर अनेक गोष्टींची चर्चा रंगते. त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटतात. धोनीच्या बाबतीत देखील हेच घडत आहे. याप्रकरणात धोनीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी मैदानातील सुमार कामगिरीवर धोनीवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर धोनीने चांगली कामगिरी करत टिकाकारांना प्रत्त्युत्तर दिले होते. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धोनीने एकहाती खिंड लढवली होती. सध्या धोनी संघाचा अविभाज्य भाग असून त्याचे २०१९ मध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून स्थान जवळ जवळ पक्के आहे.