4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने बाजी मारल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वन-डे सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. शनिवारी सिडनीच्या मैदानात हा सामना रंगणार आहे. महेंद्रसिंह धोनीसह वन-डे संघातील इतर खेळाडू ऑस्ट्रेलियात रवाना झालं आहे. सिडनीच्या मैदानावर भारतीय संघ सराव करत असताना, धोनीची भेट घेण्यासाठी एका विशेष चाहत्याने मैदानावर हजेरी लावली होती.

सिडनीत राहणाऱ्या 87 वर्षीय एडीथ नोर्मन या महेंद्रसिंह धोनीच्या कट्टर चाहत्या आहेत. त्यामुळे आपल्या आवडत्या खेळाडूला सराव करताना पहायला मिळावं यासाठी एडीथ यांनी मैदानावर हजेरी लावली होती. धोनीला ही गोष्टी समजताच त्याने वेळात वेळ काढून सराव संपल्यानंतर, एडीथ यांच्याशी गप्पा मारुन त्यांची इच्छा पूर्ण केली. धोनीशी बोलत असताना एडीथ यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता, सोशल मीडियावर धोनीचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेतून धोनीला वगळण्यात आलं होतं. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजीही व्यक्त केली होती. मात्र ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेसाठी धोनीने संघात पुनरागमन केलं आहे. 2019 साली इंग्लंडमध्ये होणारा विश्वचषक लक्षात घेता धोनीचं फॉर्मात येणं हे भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातंय.