महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कधी निवृत्त होणार, हा प्रश्न केले काही महिने चर्चेमध्ये आहे. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर, निवड समितीने धोनीला संघातून वगळत पंतला संधी देण्याचं ठरवलं. यानंतर धोनीच्या निवृत्तीबद्दल वावड्या उठत होत्या. अखेरीस धोनीने आपल्या निवृत्तीबद्दल अखेरीस निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांकडून समोर आलेली आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना नाव न घेण्याच्या अटीवर सुत्राने, धोनी आगामी वर्षात आयपीएलनंतर निवृत्ती घेईल असं म्हटलं आहे. “जर धोनीने त्याच्या निवृत्तीबद्दल निर्णय घेतला तर तो नक्कीच आयपीएलनंतर असेल. तो मोठा खेळाडू आहे, त्यामुळे त्याच्याबद्दलच्या चर्चा तुम्ही थांबवू शकणार नाही. सध्या शाररिक तंदुरुस्तीच्या दृष्टीकोनातून धोनी उत्तम कामगिरी करतोय, मात्र आयपीएलआधी तो आंतरराष्ट्रीय सामने खेळेल का याबद्दल लवकरच कळेल.” भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनीही धोनीच्या पुनरागमनाबद्दल बोलत असताना, आयपीएलपर्यंत वाट बघा असा सूचक सल्ला दिला होता.

अवश्य वाचा – IPL पर्यंत वाट बघा, धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांवर रवी शास्त्रींचं सूचक विधान

याव्यतिरीक्त बांगलादेश क्रिकेट बोर्डही आपल्या Asia XI vs Rest of World XI या सामन्यांसाठी धोनीला खेळवण्याच्या विचारात आहे. त्यामुळे धोनी आगामी काळात आपल्या निवृत्तीबद्दल नेमका कधी निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत