आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी धोनी हा आमच्यासमोरचा एकमेव पर्याय नाही, असे वक्तव्य करणाऱ्या निवड समितीचे प्रमुख एम. एल. के. प्रसाद यांनी धोनीच्या आशिया दौऱ्यातील आठवणींना उजाळा दिलाय. आशिया दौऱ्यावेळी महेंद्रसिंह धोनी पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. संघासाठी खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे निवड समिती चिंतेत होती. धोनीशिवाय पाकिस्तानसमोर संघ कसा खेळणार? हा प्रश्न सर्वांना सतावत होता. त्यावेळी धोनीने प्रसाद यांना चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. प्रसाद एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले की, धोनीची परिस्थिती पाहण्यासाठी मी जेव्हा त्याच्याकडे गेलो. त्यावेळी त्याने मला चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगितले. एवढेच नाही तर माझा एक पाय जरी मोडला तरी मी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरेन, असे धोनी म्हणाला.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वीची धोनीची आठवण सांगताना प्रसाद म्हणाले की, पाकिस्तानसोबतच्या सामन्यापूर्वी जीममध्ये व्यायाम करताना धोनीच्या कंबरेत चमक भरली. त्यावेळी वैद्यकीय चमूने धोनीला स्ट्रेचरवरुन नेले. धोनीची ही दुखापत गंभीर नसली, तरी त्याला खूप वेदना होत होत्या. तो सरळ चालू देखील शकत नव्हता. प्रसारमाध्यमांनी धोनीच्या खेळण्यासंदर्भात मला विचारले. पण त्यावेळी मी काहीच सांगू शकलो नाही. पण सामन्याच्या दिवशी धोनी मला पॅड बांधून सराव करताना दिसला. त्याचा हा आत्मविश्वास कमालीचा होता.

श्रीलंकेच्या दौऱ्याच्या सुरुवातीला निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी धोनीच्या खेळावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे पाहायला मिळाले. धोनीबद्दल अंतिम निर्णय घेण्याआधी तो आगामी सामन्यांमध्ये कसा खेळतो, हे आम्हाला पाहायचं आहे. यानंतर विश्वचषकात कोणाला संधी द्यायची हा निर्णय घेतला जाईल, असं प्रसाद म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर प्रसाद यांच्यावर चांगलीच टीका झाली.

श्रीलंका दौऱ्यावरील दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वर कुमारसोबत चांगली भागीदारी करुन त्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तर रविवारी रंगलेल्या तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माच्या साथीने त्याने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.