महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीकडे भारतीय संघाचं नेतृत्व आहे. विराटनेही अल्पावधीत आपल्याला मिळालेल्या संधीचं सोन करत आपल्याला मिळालेलं कर्णधारपद योग्य असल्याचं सिद्ध केलं. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय मैदानांसोबत परदेशातही भारतीय संघाची कामगिरी आश्वासक राहिलेली आहे. विराट कोहलीने फलंदाजीतही आक्रमक खेळ करत अनेक शतकं आणि विक्रम यादरम्यान केले. परंतू भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरच्या मते, विराट यशस्वी कर्णधार ठरण्यामागे मोठं श्रेय हे धोनीला जातं. धोनी नसता तर विराटचं करिअर केव्हाचं संपलं असतं असं गंभीरने Star Sports वाहिनीच्या Cricket Connected कार्यक्रमात बोलताना केलं आहे.

“२०१४ साली भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. मी देखील त्यावेळी भारतीय संघात होतो. भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर अनेक खेळाडूंचं निदान करिअर संपलं. पण महेंद्रसिंह धोनीने त्यावेळी विराटला चांगला पाठींबा दिला आणि त्याला आत्मविश्वास दिला, नाहीतर कोहलीचंही करिअर तेव्हाच संपलं असतं. कारण या मालिकेनंतर विराटने स्वतःच्या खेळात केलेले बदल आणि त्याची फलंदाजी ही वेगळ्या दर्जावर नेऊन ठेवली आहे.” गंभीरने जुनी आठवण सांगितली.

यावेळी गंभीरने विराटच्या फलंदाजीचं कौतुकही केलं. “विराटने ज्यावेळी भारतीय संघात पदार्पण केलं, त्यावेळी मी संघात होतो. त्यावेळपासून त्याच्यात शिकण्याची भूक होती. ड्रेसिंग रुममध्ये सिनीअर खेळाडू चर्चा करत असताना कोहली नेहमी तिकडे येऊन आपल्या खेळात सुधारणा कशी करता येईल असं विचारायचा.” सध्या करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेता बीसीसीआयने सर्व क्रिकेट सामने रद्द केले आहेत. परंतू विराट आपला फिटनेस कायम राखण्यासाठी घरीच व्यायाम करतो आहे.