२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. न्यूझीलंडने भारतावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या संपूर्ण स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीचा संथ खेळ हा मुद्दा कायम चर्चेत राहिला. विश्वचषकानंतर निवड समितीने पहिल्यांदा मोठं पाऊल उचलत धोनीला विश्रांती देत, ऋषभ पंतला संधी दिली. पंतला मिळालेल्या संधीचा लाभ उठवता आला नसल्यामुळे धोनीचे चाहते त्याला भारतीय संघात पुन्हा एकदा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तर दुसरीकडे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चाही सुरूच आहेत. धोनीने मात्र अद्याप आपल्या निवृत्तीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही, पण अशातच धोनीचा बालपणीचा मित्र आणि मॅनेजर मिहीर दिवाकर यांनी पीटीआयला एक महत्त्वाची माहिती दिली.

“मी धोनीचा मित्र आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा आम्ही सहसा क्रिकेटच्या गोष्टींव्यतिरिक्त इतर मुद्द्यांवर चर्चा करत असतो. मी सध्या त्याला भेटलो, तेव्हा त्याच्याकडे पाहून असं मुळीच वाटलं नाही तो निवृत्ती जाहीर करण्याचा विचार करत असेल. तो सध्या IPL मध्ये कसं खेळायचं यावर विचार करतोय. IPL 2020 साठी त्याने प्रचंड परिश्रम घेतले आहेत. चेन्नईमध्ये CSK च्या सराव सत्रासाठी धोनी सर्वात पहिले एक महिना आधी त्या ठिकाणी दाखल झाला होता. त्यावरूनच त्याला क्रिकेटबद्दल किती प्रेम आहे हे दिसतं”, असे मिहिर दिवाकर यांनी स्पष्ट केले.

“धोनी सध्या फार्महाऊसवर आहे. पण त्याने घरी असूनही आपला फिटनेस आहे तसा ठेवला आहे. लॉकडाउन उठवण्यात आल्यावर लवकर धोनी सरावदेखील सुरू करणार आहे. करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती किती वेगाने पूर्वपदावर येते त्यावर आता सारं काही अवलंबून आहे”, असेही ते म्हणाले.

धोनीच्या निवृत्तीवर कोण काय म्हणालं?

“धोनीला विश्वचषकात खेळताना पहायला मलाही आवडेल, परंतु सध्याच्या घडीला ते अशक्य दिसत आहे”, असे मत लिटल मास्टर सुनिल गावसकर यांनी व्यक्त केले. तर, “धोनीने भारतीय संघासाठी आतापर्यंत त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त केलं आहे. त्याने २०१९ विश्वचषकानंतर सन्मानाने निवृत्ती स्विकारायला हवी होती”, असे पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला. ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसननेदेखील या मुद्द्यावर भाष्य केले. “धोनीचे जरी वय वाढत असले, तरी त्याच्याकडे अजूनही कौशल्य आणि चपळता आहे. त्यामुळे निवृत्ती घ्यावी की आणखी खेळावे हा निर्णय सर्वस्वी त्याचा आहे. तो जो काहीही निर्णय घेईल, तो योग्यच असेल”, असा विश्वास वॉटसनने धोनीबद्दल व्यक्त केला.