२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने २ महिने क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचं ठरवलं. यापुढील मालिकांसाठी ऋषभ पंत हा भारताचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असेल असं निवड समितीने याआधीच स्पष्ट केलं होतं. मात्र विंडीज आणि आफ्रिकेविरुद्ध मालिकेत ऋषभला फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. यानंतर धोनीला पुन्हा एकदा भारतीय संघात संधी द्यावी अशी मागणी होत होती. याचदरम्यान धोनीने आपण नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुट्टीवरच राहणार असल्याचं जाहीर केलं. मात्र BCCI ला ऋषभ पंतला तयार करण्यासाठी आणि गरज पडल्यास त्याला पर्याय शोधण्यासाठी धोनीने भारतीय संघाबाहेर राहणं पसंत केल्याचं बोललं जात आहे.

नोव्हेंबर महिन्यापर्यंत क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे धोनी आगामी बांगलादेश विरुद्ध मालिकेत खेळणार नाहीये. या काळात आगामी टी-२० विश्वचषकासाठी ऋषभ पंतला अधिक चांगल्या पद्धतीने तयार करण्यासाठी आणि ऋषभला योग्य पर्याय तयार करण्यासाठी धोनीने बीसीसीआयला वेळ दिला असल्याचं बोललं जात आहे. IANS वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

२०१९ विश्वचषक स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय राजकारणामधून निवृत्ती घेणार होता. विश्वचषकात धोनीच्या संथ खेळामुळे त्याने निवृत्ती स्विकारावी अशी टीकाही त्याच्यावर करण्यात आली होती. मात्र आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता धोनीने सध्या निवृत्ती स्विकारु नये असं विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाचं मत होतं. त्यामुळे दरम्यानच्या काळात ऋषभ पंतच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही आणि त्याला योग्य पर्यायी खेळाडू मिळाला नाही तर महेंद्रसिंह धोनीचा आगामी टी-२० विश्वचषकासाठी पुन्हा एकदा विचार केला जाऊ शकतो.