भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आम्रपाली या रियल इस्टेट कंपनीच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदाचा राजीनामा दिल्यानंतर हरभजन सिंहने त्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. वेल डन, धोनी तू आम्रपाली बिल्डर्ससोबत नाते तोडून चांगला निर्णय घेतला आहेस. २०११ विश्वचषकानंतर त्यांनी आपल्याला घरे देण्याची कबूल केले होत, मात्र अजूनही त्यांनी ती दिलेली नाहीत, असे ट्विट भज्जीने केले आहे. या बिल्डरने २०११मध्ये भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर अंतिम फेरीत खेळणाऱ्या ११ खेळाडूंना फ्लॅट देण्याची घोषणा केली होती. दरम्यान , भज्जीच्या या ट्विटनंतर आम्ही भारतीय संघाला फ्लॅट बक्षिस म्हणून देण्याच्या घोषणेवर आजही कायम असल्याचे आम्रपाली ग्रुपकडून स्पष्ट करण्यात आले. त्या सर्व संघसदस्यांनी आमच्याकडे यावं, आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी आणि फ्लॅटचा ताबा घ्यावा, असे आम्रपाली ग्रुपकडून सांगण्यात आले.


आम्रपाली‘ने नोएडा येथे सॅफायर नावाचा प्रकल्प आहे. कंपनीच्या अन्य प्रकल्पांसह या प्रकल्पाची जाहिरात धोनीने केली होती. मात्र या प्रकल्पामध्ये घर खरेदी केलेल्या ग्राहकांनी गैरसोयींबद्दल तसेच प्रलंबित कामांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच तक्रारींबाबत सोशल मिडियावर मोहिमही उघडली. त्यानंतर धोनीने प्रलंबित कामे पूर्ण करून देण्याची खात्री द्यावी किंवा कंपनीपासून वेगळे व्हावे असे आवाहन केले होते. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत धोनीने अॅम्बेसेडरपदाचा राजीनामा दिला. धोनी यापुढे आम्रपाली ग्रुपच्या कोणत्याही जाहिराती करणार नाही.