व्यावसायिक उत्पादनांच्या प्रचार व जाहिरात मोहिमेसाठीच्या फोर्ब्सच्या नाममुद्रा मूल्यांच्या (ब्रॅण्ड व्हॅल्यू) यादीत भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीने फोर्ब्सच्या मौल्यवान खेळाडूंच्या यादीत स्थान पटकावले आहे. या यादीमध्ये स्थान पटकावलेला तो भारताचा एकमेव खेळाडू आहे. फोर्ब्सच्या यादीमध्ये अमेरिकेचा बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स अग्रस्थानावर आहे. त्याचबरोबर जागतिक कीर्तीचा गोल्फपटू टायगर वूड्स आणि टेनिसमधील रॉजर फेडरर यांनीही या यादीमध्ये स्थान पटकावले आहे.
या यादीमध्ये धोनी पाचव्या क्रमांकावर असून त्याचे या वर्षांतील नाममुद्रा मूल्य २० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढे आहे. गेल्या वर्षीपेक्षा त्याच्या नाममुद्रा मूल्यामध्ये दहा लाख डॉलर्सची घट झाली आहे. फोर्ब्सने दहा अव्वल नाममुद्रा मूल्य असलेल्या खेळाडूंचा या यादीमध्ये समावेश केला आहे. अव्वल स्थानावर असलेल्या जेम्सचे नाममुद्रा मूल्य ३७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. जेम्सचे नाइकी, मॅकडोनाल्ड्स, कोका-कोला या कंपन्यांशी करार आहेत. टायगर वूड्सचे नाममुद्रा मूल्य ३६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स असून तो यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. फेडरर ३२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या नाममुद्रा मूल्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीमध्ये अव्वल धावपटू युसेन बोल्ट (६), पोर्तुगालचा सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (७), अर्जेटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी (९), टेनिसपटू राफेल नदाल (१०) यांचा समावेश आहे.
अव्वल १० जण
१) लेब्रॉन जेम्स
२) टायगर वूड्स
३) रॉजर फेडरर
४) फिल मिकेलसन
५) महेंद्रसिंग धोनी
६) युसेन बोल्ट
७) ख्रिस्तियानो रोनाल्डो
८) कोबे ब्रायन्ट
९) लिओनेल मेस्सी
१०) राफेल नदाल