कामगिरीतील सातत्य, संघातील स्थान आणि टी-२० संघातून निवृत्ती यावरून मागील काही दिवसांपासून सतत होणाऱ्या टीकेला अखेर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने उत्तर दिले आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा हक्क आहे आणि आपण त्यांच्या मताचा आदर करायला हवा, असे मत धोनीने व्यक्त केले आहे. टी-२० सामन्यातील कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या टीकाकारांना धोनीने उत्तर दिले आहे. माजी जलद गोलंदाज अजित अगरकरने धोनीच्या संघामधील कामगिरीबद्दल प्रश्न उपस्थित केला होता तर माजी फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मणनेही धोनीच्या टी-२० क्रिकेटमधील भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.

धोनीने शांत आणि संयमी शब्दांमध्ये आपल्या सर्व टीकाकारांना उत्तर दिले आहे. ‘भारतीय संघात खेळण्याची संधी मिळणेच खूप प्रेरणादायी असते. क्रिकटर्सवर देवांचे विशेष लक्ष असते असे नाही मात्र तरीही काही क्रिकेटपटूंचे करियर अनेक वर्षे चालते, असे धोनी म्हणाला. एखाद्या खेळाडूचे करियर जास्त वर्षे चालण्यामागील मुख्य कारण त्या खेळाडूचे खेळाबद्दलचे प्रेम आणि खेळण्याची इच्छा. प्रशिक्षकांना हेच समजून घेण्याची गरज आहे. प्रत्येक खेळाडू देशासाठी खेळू शकत नाही. निर्णयापेक्षा आपण त्या निर्णयापर्यंत कसे पोहोचतो याचा प्रवास जास्त महत्वाचा आहे, असे मला वाटते. मी कधी निकालांचा विचार करत नाही. सतत योग्य गोष्टी करण्याचा माझा प्रयत्न असतो असेही धोनी म्हणाला. दुबईमधील आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अकादमीच्या उद्घाटनाच्या वेळी धोनी बोलत होता.

… म्हणून हॅलिकॉप्टर शॉट नको

धोनीला यावेळी हॅलिकॉप्टर शॉटबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्याने तरुण खेळाडूंने अशा प्रकारचे फटके मारण्याचा प्रयत्न करु नये असे स्पष्टपणे म्हटले. मी टेनिस बॉलने खेळताना हा फटका शिकलो. हा फटका खेळणे कठीण आहे. टेनिस बॉलने खेळताना तो बॅटच्या तळाला लागला तरी सीमेपार जातो. मात्र खऱ्याखुऱ्या क्रिकेटमध्ये हा फटका बॅटच्या मध्यातूनच मारावा लागतो. तरुणांनी हा शॉर्ट खेळावा असे मला वाटतं नाही, कारण त्यामुळे त्यांना इजा होऊ शकते अशी भीती धोनीने व्यक्त केली.