आयपीएलचा बारावा हंगाम आता उत्तरार्धाकडे पोहचला आहे. चेन्नई, दिल्ली आणि मुंबईचा संघ बाद फेरीसाठी पात्र ठरला आहे. दुसरीकडे ३० मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होते आहे. भारताने या स्पर्धेसाठी आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. अपेक्षेप्रमाणे संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी ही अनुभवी धोनीच्या खांद्यांवर सोपवण्यात आली आहे. भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार यावर गेले अनेक महिने चर्चा सुरु आहे. मात्र भारताचे माजी क्रिकेटपटू के.श्रीकांत यांच्या मते धोनीच भारतासाठी चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून योग्य आहे.

“गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजीसाठी येणार यावर चर्चा होते आहे. प्रत्येकाने यावर आपापली मतं दिली आहेत. मात्र माझ्या मते, भारतीय संघासाठी धोनी हा चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. धोनी व्यतिरीक्त कोणताही फलंदाज या जागेसाठी योग्य नाहीये. धोनीला चौथ्या क्रमांकावर सतत संधी का देण्यात आली नाही हा मला नेहमी प्रश्न पडतो.” टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात लिहीलेल्या कॉलममध्ये श्रीकांत यांनी आपले विचार मांडले आहेत.

२०११ साली विश्वचषक विजेच्या भारतीय संघाची निवड श्रीकांत यांच्या निवड समितीने केली होती. गेल्या काही वर्षात भारतीय संघाने चौथ्या क्रमांकावर अनेक खेळाडूंना संधी दिली. अंबाती रायुडू, विजय शंकर, केदार जाधव यासारख्या फलंदाजांना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली. त्यामुळे विश्वचषकात धोनी कितव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.