ऑस्ट्रेलियन महिला संघ सध्या घरच्या मैदानावर न्यूझीलंड संघाविरूद्ध टी२० मालिका खेळत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत मालिकेत २-०ची अजिंक्य आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करत १२८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांनी १६.४ षटकांत २ बाद १२९ धावा केल्या आणि ८ गडी राखून न्यूझीलंडवर विजय मिळवला.

१७ धावांत २ बळी टिपणारी सोफी मॉलिनूक्स सामनावीर ठरली, पण यष्ट्यांमागे आपलं कर्तव्य चोख पार पाडणारी एलिसा हिली सामन्यात चर्चेचा विषय ठरली. एलिसा हिली हिने यष्टीरक्षण करताना सामन्यात दोन गडी बाद करण्यात सक्रीय सहभाग नोंदवला. याच कामगिरीसोबत तिने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा विक्रम मोडीत काढला.

टी२० क्रिकेटमध्ये गडी बाद करण्यात सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्यांच्या यादीत (झेल आणि स्टंपिंग) धोनी अव्वल होता. त्याच्या नावावार ९८ सामन्यांमध्ये ९१ बळी होते. मात्र एलिसाने आपल्या ९९व्या टी२० सामन्यात ९२ बळींमध्ये सक्रीय सहभाग नोंदवत धोनीला मागे टाकले. धोनीच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ५७ झेल आणि ३४ स्टंपिंगचा समावेश आहे. तर एलिसा हिलीच्या नावे ४२ झेल आणि ५० स्टंपिंग आहेत. केवळ महिलांच्या टी२० क्रिकेटची आकडेवारी पाहता, यादीत इंग्लंडची यष्टीरक्षक सारा टेलर ७४ बळींसह दुसऱ्या स्थानी आहे.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे एलिसा हिली ही ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क याची पत्नी आहे. २०१६मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले.

याशिवाय, एलिसा ही ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक इयन हिली यांची भाची आहे.