प्रशांत केणी

जोवर पूर्णविराम नसतो, तोवर वाक्य अपूर्ण असतं, असं महेंद्रसिंह धोनीनं म्हटलं होतं. गतवर्षीच्या विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यानंतर तसं पाहिलं तर धोनीच्या कारकीर्दीपुढे अपूर्णताच होती, परंतु धूसर प्रश्नांकित. कारकीर्दीच्या उत्तरार्धातील धावांसाठीचं झगडणं, हे आकडय़ांनिशी सिद्ध होत होतं. ट्वेन्टी-२० विश्वचषक लांबणीवर पडला आणि धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीपुढे पूर्णविराम दिला. रांचीतल्या मध्यमवर्गीय कुटुंबातून क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या धोनीच्या विचारातून त्याची प्रतिष्ठा घडली, हे त्यानं पदोपदी आपल्या असंख्य मतं-भावना-प्रतिक्रियांतून सिद्ध केलं.

क्रिकेटपटूनं केव्हा थांबावं, याचंही धोनीनं एकदा विश्लेषण केलं होतं, ‘‘तुम्ही १०० टक्के तंदुरुस्त नसाल आणि सर्वोत्तम कामगिरी होत नसेल आणि तरी खेळत राहिलात, तर तुम्ही फसवणूक करीत आहात.’’ आपल्या याच विधानाची पूर्णत: जाणीव ठेवत धोनीनं निवृत्तीचा निर्णय घेतला. वानखेडे स्टेडियमवर २०१६च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना गमावल्यानंतर भारताचं आव्हान संपुष्टात आलं. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाचा पत्रकार सॅम्युएल फेरीसने धोनीला ‘‘यापुढेही खेळत राहणार का?’’ असा प्रश्न विचारून डिवचलं होतं. तेव्हा शेजारच्या खुर्चीवर बसण्यासाठी आमंत्रित करीत धोनीनं त्यालाच प्रश्न विचारले. २०१९च्या विश्वचषकात मी खेळू शकेन का, या प्रश्नाला ‘‘हो’’ असं उत्तर देताच धोनी म्हणाला, ‘‘तूच तुझ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. मित्रा, तू चुकीचा दारूगोळा, चुकीच्या वेळी वापरला आहेस!’’

भारतानं जिंकलेल्या तीन विश्वचषकांपैकी, दोनदा जगज्जेतेपद धोनीच्या नेतृत्वाखाली साध्य झाले आहेत. याचं त्याला अतिशय अप्रूप वाटतं. तो म्हणतो, ‘‘विश्वचषक जिंकणं, हे अद्वितीय होतं. कारण अनेकांसाठी त्याचं बरंच महत्त्व होतं. आपल्या देशात एकच समान धागा आहे, तो म्हणजे क्रिकेट. देशवासीयांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद हा माझ्या सदैव स्मरणात राहील.’’

धोनीची देशाबाबतची आत्मीयता अशी असंख्य प्रसंगांमधून दिसून आली आहे. ‘‘माझं माझ्या देशावर अतिशय प्रेम आहे. माझ्या जीवनातील महत्त्वांचे क्रम लावल्यास देश, आई-वडील यांच्यानंतर तिसरी महत्त्वाची व्यक्ती तू आहेस,’’ हे धोनीनं पत्नी साक्षीला लग्नाआधीच स्पष्ट केलं होतं. तसेच क्रिकेटपटू झालो नसतो, तर सैनिक नक्कीच झालो असतो, असंही तो बऱ्याचदा म्हणाला आहे. क्रिकेट हे मी राष्ट्रीय कर्तव्य मानतो. बाकीची सर्व कर्तव्ये वाट पाहू शकतात, हे धोनीचं वाक्य त्याचा दृष्टिकोन मांडतं. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात विश्वचषक क्रिकेट स्पर्धा चालू असताना त्याच्या कन्येचा (झिव्हा) जन्म झाला. जन्म-मृत्यू यांसारख्या महत्त्वाच्या कौटुंबिक प्रसंगांचे साक्षीदार होण्यासाठी क्रिकेटपटूंना तातडीची रजा मिळू शकते, परंतु तो भावनिकतेपुढे ढळला नाही. दीड महिन्यांची स्पर्धा पूर्ण होऊन देशात परतल्यावरच त्याला कन्येला जवळ घेता आलं.

एक अब्ज भारतीय जनतेच्या अपेक्षांचं ओझं सांभाळून कठीण प्रसंगातही डोकं बर्फासारखं थंड ठेवून मैदानावर सामन्याचं चित्र पालण्याची क्षमता असणाऱ्या धोनीच्या विचारांत स्पष्टता होती. ‘‘दडपणाविषयी माणसं नकारात्मक पद्धतीनं विचार करतात. माझ्यासाठी दडपण म्हणजे अतिरिक्त जबाबदारी असते. मी तरी याच पद्धतीने त्याकडे पाहतो. देव तुम्हाला तुमच्या देशासाठी किंवा संघासाठी नायक होण्याची संधी देतो, तेव्हा तुम्ही त्याला दडपण कसं म्हणाल?’’  त्याहीपुढे जाऊन तो म्हणतो, ‘‘मी क्रिकेटरसिकांसाठी नव्हे, तर देशासाठी खेळतो.’’

जय-पराजय हा कोणत्याही खेळाचा अविभाज्य भाग असतो. पराभवातून खचून जाण्यापेक्षा पुढील आव्हानांतून यश मिळवणं महत्त्वाचं असतं. याविषयीही धोनी एखाद्या तत्त्ववेत्त्याप्रमाणे म्हणतो की, ‘‘आयुष्यात खच्चीकरण करणारे अनेक क्षण येतात. पण काळजी करू नका. नेहमी एकच लक्षात ठेवा : पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!’’ पराभवाचं आत्मपरीक्षण करताना सामन्यातील किंवा मालिकेतील चुकांविषयी तो म्हणतो, एखादी चूक पुन्हा होणार नाही, हे शिकणं आयुष्यात महत्त्वाचं असतं.

अपयशाची कारणमीमांसा करणाऱ्या प्रसारमाध्यमांना २०११च्या विश्वविजेतेपदानंतर धोनीनं सुनावलं होतं- ‘‘रांचीतल्या माझ्या घरी तीन कुत्रे आहेत. मालिका जिंको अथवा हरो, त्यांच्या वागण्यात कोणताच बदल नसतो.’’ धोनी आपल्या अनेक पत्रकार परिषदांमध्ये ‘प्रक्रिया’ हा शब्द अनेकदा वापरायचा. एखाद्या निष्णात व्यवस्थापन गुरूप्रमाणे तो सामन्याच्या प्रक्रियेकडे पाहतो. योग्य प्रक्रिया ही विजयापेक्षाही त्याला मोलाची वाटते. त्यामुळेच कदाचित हेच त्याच्या यशाचं रहस्य असावं. लोकांनी मला फक्त चांगला क्रिकेटपटू नव्हे, तर चांगला व्यक्ती म्हणूनही लक्षात ठेवावे, असं म्हणणाऱ्या धोनीनं क्रि के ट प्रवासात आपल्या विचारधारेला पूर्णत: न्याय दिला. स्वातंत्र्यदिनी सायंकाळी ७ वाजून २९ मिनिटांनी आपला निवृत्तीचा निर्णय घोषित करतानाही कवी साहीर लुधियानवीने लिहिलेल्या गीतातून आयुष्यातील क्षणभंगुरताच त्यानं मांडली-

‘‘मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है..’’

prashant.keni@expressindia.com