भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी काही काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघातलं आपलं स्थान गमावलं. आगामी टी २० विश्वचषक आणि धोनीचं वाढतं वय लक्षात घेता त्याच्या संघातील पुनरागमनाच्या शक्यता कमी झाल्या आहेत. पण भारताचे माजी प्रशिक्षक आणि फिरकीपटू अनिल कुंबळे याने धोनीबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

यशस्वी भव! 2020 मध्ये असा असेल ‘विराटसेने’चा कार्यक्रम

धोनीबद्दल काय म्हणाला कुंबळे?

“IPL मध्ये धोनी कशाप्रकारे खेळतो त्यावर त्याचं क्रिकेटपटू म्हणून भवितव्य अवलंबून आहे. त्याचसोबत टी २० विश्वचषकात भारतीय संघाला धोनीची किती गरज आहे, त्यावर त्याचं संघातील स्थान अवलंबून आहे. सध्या तरी आपल्याकडे गप्प बसून वाट पाहण्यापलीकडे काहीही पर्याय नाही”, असे कुंबळे क्रिकेटनेक्स्टशी बोलताना म्हणाला.

IPL 2020 : अश्विनने दिलं फलंदाजांना ‘ओपन चॅलेंज’

धोनीची आतापर्यंतची कारकिर्द

बांगलादेशविरूद्ध २३ डिसेंबर २००४ ला धोनीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याला कसोटी पदार्पणासाठी जवळपास वर्षभर वाट पाहावी लागली. धोनीने २ डिसेंबर २००५ रोजी श्रीलंकाविरूद्ध पहिली कसोटी खेळली. त्यानंतर पुन्हा तब्बल वर्षभराच्या कालावधीने त्याने १ डिसेंबर २००६ ला टी २० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कसोटी कारकिर्दीत धोनीने ९० कसोटीत १४४ डावात ४ हजार ८७६ धावा केल्या. त्यात त्याने ६ शतके आणि ३३ अर्धशतके ठोकली. नुकतेच त्याच्या १५ वर्षाच्या यशस्वी क्रिकेट कारकिर्दीसाठी त्याला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.

Video : ‘फायरफायटर’ मॅक्सवेल! स्टेडियमबाहेर लागली आग अन्…

‘विकेट-टेकिंग’ गोलंदाज की अष्टपैलू खेळाडू?

“भारतीय संघात गडी बाद करण्याची क्षमता असणारे फिरकीपटू असणे आवश्यक आहेत. कुलदीप यादव किंवा युझवेंद्र चहल या गोलंदाजांमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे. त्यामुळे या दोघांचा संघात समावेश असायला हवा. अनेकदा चेंडू दव पडल्याने ओला होतो, त्यावेळी मनगटी फिरकीपटू उपयुक्त ठरतात. संघ व्यवस्थापनाने गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांना संघात स्थान दिले पाहिजे. याचा असाही अर्थ आहे की अष्टपैलू खेळाडूंपेक्षा भारतीय संघाने गडी बाद करण्याची क्षमता असणाऱ्या वेगवान गोलंदाजांना संधी दिली पाहिजे”, असे मत कुंबळेने व्यक्त केलं.