महेंद्रसिंग धोनीची चाल कधीच कोणाला कळली नाही, ना प्रतिस्पध्र्याना, ना क्रिकेटतज्ज्ञांना, ना माजी क्रिकेटपटूंना, ना क्रिकेट रसिकांना. प्रत्येक वेळी त्याने अद्भुत चाली खेळत समोरच्याला धक्के दिले आणि तसाच एक मोठा धक्का त्याने कसोटी क्रिकेटला अलविदा करून दिला. यापूर्वी त्याने विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटप्रकारातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले होते, परंतु तरीही मेलबर्न कसोटी सामन्यानंतर तडकाफडकी तो कसोटी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेईल, असे कुणालाही वाटले नव्हते. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा सामना अनिर्णित राखल्यावर काही तासांमध्ये धोनीने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय समोर आल्यावर सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. कदाचित काळाची पावले ओळखून संघातील जागा अडवण्यापेक्षा युवा खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी त्याने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सिडनीतील चौथ्या कसोटी सामन्यामध्ये विराट कोहली भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा वाहणार आहे. धोनीने कसोटी कारकीर्दीध्ये ९० सामने खेळले, ज्यामध्ये ६० सामन्यांमध्ये त्याने भारताचे कर्णधारपद भूषवले आहे.
spt01
‘‘एक महान कर्णधार ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते, त्या महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीने तात्काळ कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असली तरी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये तो संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. धोनीच्या कसोटी निवृत्तीच्या निर्णयाचा आदर ठेवत आम्ही त्याचे कसोटी क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहलीकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे,’’ असे बीसीसीआयने पत्रकात म्हटले आहे.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये धोनीने निवृत्तीबद्दल कोणतेही मत व्यक्त केले नाही. साऱ्यांनाच बीसीसीआयच्या पत्रकाद्वारे ही माहिती समजली. परदेशातील कसोटी क्रिकेटमधील वाईट कामगिरीमुळे धोनीने हा निर्णय घेतला असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली परदेशामध्ये भारताला ३० पैकी फक्त सहा सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर मायदेशामध्ये धोनीने ३० पैकी २१ सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला होता.
२०११ साली इंग्लंडच्या दौऱ्यात भारताला ०-४ असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता, त्यानंतर याच वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या पदरी निराशाजनक पराभव पडला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्येही भारताला कसोटी मालिका गमवावी लागली होती. इंग्लंडने तर भारतीय संघाला धोनीच्या नेतृत्वाखाली त्यांच्याच मातीत पराभूत केले होते. या साऱ्या पराभवांमुळे त्याच्यावर टीकेची झोड उठत होती.
मेलबर्न येथील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी धोनीने भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांची नोंद केली होती. या सामन्यातील दुसऱ्या डावात धोनीने (३४५४) भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (३४४९) यांचा विक्रम मोडीत काढला.
धोनीने ६० सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवले, ज्यामध्ये २७ विजयांसह १८ पराभवांचा समावेश आहे, तर १५ सामने अनिर्णित राखण्यात धोनीला यश आले. कारकीर्दीतील ९० सामन्यांमध्ये धोनीने ३८.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या असून यामध्ये सहा शतकांसह ३३ अर्धशतकांचा समावेश आहे.
२००८ साली अनिल कुंबळेने निवृत्ती जाहीर केल्यावर धोनीकडे कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोपवण्यात आले. २०१३ साली धोनी भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार झाला. या वेळी माजी कर्णधार सौरव गांगुलीचा २१ कसोटी विजयांचा विक्रम त्याने मोडीत काढला.

चांगली भागीदारी झाल्यावरही आम्ही स्थिरस्थावर झालेले फलंदाज गमावले आणि स्वत:लाच अडचणीत आणले. पण हा सामना आम्ही अनिर्णीत सोडवू शकलो याबद्दल आनंदी आहे. संघाने चांगली कामगिरी केली असली तरी अजून बऱ्याच गोष्टींमध्ये आम्हाला सुधारणेची गरज आहे.
महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार

डाव सोडण्याबाबत मी द्विधा मन:स्थितीमध्ये होतो. डाव घोषित करण्याचा निर्णय मनाशी पक्का होत नव्हता. खेळपट्टीची अवस्था चांगली असल्याने भारतीयांना लवकर फलंदाजीसाठी आमंत्रित करणे मला पटत नव्हते. पाचव्या दिवशीही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती, त्यामुळेच डाव सोडण्याचा निर्णय लांबला.
स्टिव्हन स्मिथ, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

आश्चर्यकारक व अनपेक्षित..
धोनीचा निर्णय खरोखरीच आश्चर्यकारक व अनपेक्षित आहे. तो एवढय़ा लवकर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करले असे वाटले नव्हते. तो कसोटी कारकीर्दीत आणखी दोन-तीन वर्षे सहज खेळू शकला असता. कर्णधारपद भूषविणाऱ्या खेळाडूला सतत मानसिक ओझ्याखाली राहावे लागते. मेलबर्न येथील सामन्यात त्याच्या मानसिक तंदुरुस्तीची कसोटीच होती. सिडनी येथील कसोटीनंतर तो कर्णधारपद सोडण्याची शक्यता मला वाटत होती.
-सुनील गावस्कर, भारताचे माजी कप्तान

धोनीचा निर्णय अनपेक्षित वाटत नाही. विशेषत: परदेशातील दौऱ्यात धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला फारसे यश मिळत नव्हते. त्यामुळे त्याच्या कर्णधारपदावरून टीकाही होत होती, मात्र कसोटीतून लगेच निवृत्त होईल असे वाटले नव्हते. खेळाचे व संघाचे हित लक्षात घेऊन त्याने हा निर्णय घेतला आहे व हा निर्णय योग्य आहे.
-चंदू बोर्डे, भारताचे माजी कसोटीपटू

धोनीकडून या निर्णयाची अपेक्षा होती, कारण परदेशातील मालिकांमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताला अपेक्षेइतकी चांगली कामगिरी करता आली नव्हती, मात्र त्याने ही मालिका होईपर्यंत थांबायला पाहिजे होते. दुखापतीमुळे त्याला या मालिकेतील पहिल्या कसोटीत भाग घेता आला नव्हता. त्यामुळे त्याने सिडनी येथील कसोटीनंतर हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. अर्थात, त्याचा हा निर्णय खरोखरीच कौतुकास्पद आहे.
-अजित वाडेकर, भारताचे माजी कप्तान

हा निर्णय खूपच धक्कादायक आहे. आणखी दोन-तीन वर्षे कसोटी कारकीर्द खेळण्यासाठी आवश्यक असणारी तंदुरुस्ती त्याच्याकडे आहे. परदेशातील त्याची कामगिरी फारशी लक्षणीय ठरलेली नाही, मात्र परदेशातील खेळपट्टय़ांवर प्रतिस्पर्धी संघाला दोन्ही डावांत गुंडाळण्याची क्षमता असलेली प्रभावी गोलंदाजी आपल्या संघाकडे नाही. त्यामुळेही त्याला पराभव स्वीकारावा लागत होता. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
-दिलीप वेंगसरकर, भारताचे माजी कप्तान

संघाला सर्वोच्च स्थानावर नेण्याची क्षमता धोनीकडे आहे. त्याने कसोटीप्रमाणेच ट्वेन्टी-२० व एकदिवसीय क्रिकेट या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाला जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर नेले आहे. टायगर पतौडी व सौरव गांगुली यांच्याइतके वलय त्याला लाभले नसेल, मात्र सहकारी खेळाडूंकडून इप्सित ध्येय साध्य करून घेण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. मात्र त्याने हा दौरा पूर्ण होईपर्यंत थांबायला पाहिजे होते.
-इरापल्ली प्रसन्ना, भारताचे माजी फिरकीपटू

धोनीच्या ट्विटरवरही चाहत्यांकडून संदेशांचा वर्षांव
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटीतून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याच्या ‘ट्विटर’वरही असंख्य चाहत्यांनी त्याला संदेश पाठविले आहेत.
भारताचा विक्रमवीर सचिन तेंडुलकरने धोनीला आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना त्याच्या आजपर्यंतच्या कसोटी कारकिर्दीबद्दल प्रशंसोद्गार व्यक्त केले आहेत. धोनी पुन्हा विश्वचषक जिंकायचा आहे, असे त्याने म्हटले आहे.
अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने म्हटले आहे, ‘‘धोनी तू ज्या धडाकेबाज पद्धतीने संघाचे नेतृत्व केले, त्याच धडाकेबाज वृत्तीने तू कसोटीतून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करीत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.’’
कर्नाटकचा आर.विनयकुमार, तसेच प्रग्यान ओझा, संजय मांजरेकर, माजी कर्णधार बिशनसिंग बेदी, पाकिस्तानचा माजी कर्णधार सकलेन मुश्ताक यांनीही धोनीचे अभिनंदन केले आहे.
धोनीचा निवृत्तीचा निर्णय विचारपूर्वक -पटेल
नवी दिल्ली :  महेंद्रसिंग धोनीचा कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय अचानकपणे साऱ्यांसमोर आला असला तरी त्याने हा निर्णय घेताना कोणतीही घाई केलेली नाही, त्याचा हा निर्णय विचारपूर्वक आणि आत्मपरीक्षण करून घेतला असल्याचे मत भारतीय क्रिकेट मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय पटेल यांनी व्यक्त केले.
‘‘धोनी हा वास्तववादी माणूस आहे. मेलबर्न कसोटी संपल्यावर तो माझ्याकडे आला आणि मला कसोटी क्रिकेटमधून निवृत्त व्हायचे असल्याचे सांगितले. यावर मी त्याला विचारले की, काय झाले, दुखापतीमुळे तू हा निर्णय घेत आहेस का? यावर धोनीने शांतपणे सांगितले की, नाही, कसोटी क्रिकेटच्या भल्यासाठी मला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी, असे वाटत आहे. हा धोनीचा वैयक्तिक निर्णय असून त्याच्या या निर्णयाचा आदर करायलाच हवा,’’ असे पटेल यांनी सांगितले.
पटेल पुढे म्हणाले की, ‘‘धोनीला मी विचारले की, तुझा हा अंतिम निर्णय आहे का? यावर तो म्हणाला की, मी अजून संघ सहकाऱ्यांना हा निर्णय कळवलेला नाही. त्यानंतर त्याने संघ सहकाऱ्यांना कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे कळवले. दरम्यान मी निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील आणि शिवलाल यादव यांना ही बातमी कळवली. त्यांनीही धोनीच्या या निर्णयाचा आदर करायला हवा, असे म्हटले.’’