भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा एकदिवसीय विश्वचषक २०१९ नंतर क्रिकेटच्या मैदानावर अद्याप परतलेला नाही. IPL 2020 च्या माध्यमातून त्याला आपला खेळ दाखवायची संधी होती, पण करोना व्हायरसच्या फटक्यामुळे IPL चे आयोजन लांबणीवर पडले. त्यामुळे धोनीला आता आपण इतरांसारखाच खेळ करू शकतो हे दाखवून देण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. पण तरीदेखील आता धोनीला टीम इंडियात स्थान मिळणं जरा कठीणंच दिसतंय, असं रोखठोक मत भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने याने म्हटलं आहे.
सेहवागने दिलं ‘हे’ कारण
अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमासाठी सेहवाग आला होता. त्यावेळी सेहवागला धोनीबद्दल विचारण्यात आले. त्यावर सेहवागने रोखठोक उत्तर दिले. “आता धोनी संघात कोणत्या जागी खेळणार? लोकेश राहुल आणि ऋषभ पंत हे दोन प्रतिभावंत फलंदाज आणि यष्टीरक्षक सध्या संघाकडे आहेत. या दोघांची गेल्या काही महिन्यांतील कामगिरी उल्लेखनीय आहे. अशा परिस्थितीत या दोघांनाही एकाच वेळी संघातून बाहेर काढण्याचं कोणतंही कारण मला तरी दिसत नाही”, अशा शब्दात सेहवागने धोनीचं पुनरागमन कठीण असल्याचं सांगितलं.
न्यूझीलंडमधील भारताच्या पराभवाबाबत
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर टी २० मालिका ५-० ने जिंकला, तर एकदिवसीय आणि कसोटी मालिका अनुक्रमे ३-० आणि २-० ने पराभूत झाला. त्यावर सेहवाग म्हणाला की टी २० मध्ये न्यूझीलंडच्या संघाचा अतिशय कमी फरकाने पराभव झाला, कारण कमी कालावधीच्या क्रिकेट सामन्यांमध्ये पुनरागमन करणं कठीण असतं. पण एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा संघ हा आपल्या संघापेक्षा खूपच चांगला होता हे आपण मान्य केलं पाहिजे.
विराटचा अपयशी न्यूझीलंड दौरा
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने न्यूझीलंड दौऱ्यावर खराब कामगिरी केली. त्याच्या निराशाजनक कामगिरीबाबत बोलताना सेहवाग म्हणाला की कोहली हा एक उत्तम फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत अनेक चांगल्या खेळी करून दाखवल्या आहेत. पण प्रत्येक एखादा असाही काळ येतो जेव्हा तुमची फलंदाजी फारशी चालत नाही. सचिन तेंडुलकर, स्टीव्ह वॉ, जॅक कॅलिस, रिकी पॉन्टींग.. सगळ्यांना यातून जावं लागलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 18, 2020 11:45 am