माजी कर्णधार एमएस धोनी सध्या भारतीय क्रिकेट संघाचा अविभाज्य भाग आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून धोनीच्या निवृत्तीबाबतच्या चर्चा सुरू आहेत. इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकणार, असा तर्क लावला जात आहे. अर्थात हे सर्व तर्कवितर्क आहेत. वाढत्या वयासोबत धोनीनंही निवृत्तीनंतरचा आपले करियर निवडलं आहे. धोनीनं स्वत: याचे उत्तर दिले आहे.

पेंटीगच्या क्षेत्रात धोनी क्रिकेटनंतर आपलं नशीब अजमावणार आहे. धोनीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये धोनीनं निवृत्तीनंतर पेंटीग काढणार असल्याचे सांगितले आहे. लवकरच पेंटींगचे प्रदर्शन भरवणार असल्याचे यामध्ये धोनीनं सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये धोनीनं स्वत: काढलेल्या काही पेंटींग्जही दाखवल्या आहेत. निवृत्तीनंतर धोनी काय करणार? चाहत्यांच्या या प्रश्नाचे उत्तर खुद्द देत धोनीनं चर्चेला पुर्णविराम दिला आहे.

इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी धोनी रवाना झाला आहे. वय पाहता कदाचीत ही त्याची अखेरची स्पर्धा असेल. त्यामुळे धोनीकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ चा ट्वेंटी-२० आणि २०११चा विश्वचषक जिंकला आहे. धोनीच्या अनुभवाचा भारतीय कर्णधार विराट कोहलीला नक्कीच फायदा होईल.