आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅप्टन कूल अशी स्वतःची ओळख असलेला महेंद्रसिंह धोनी गेलं वर्षभर क्रिकेटपासून दूर आहे. करोना विषाणूचा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात धोनी आपली पत्नी साक्षी, मुलगी झिवासोबत रांची येथील फार्म हाऊसमध्ये राहतो आहे. लॉकडाउन काळात अन्य खेळाडू सोशल मीडियावर एकमेकांशी गप्पा मारत असताना धोनीने फारसं सोशल मीडियावर न येणं पसंत केलं. या काळात धोनीने रांचीच्या फार्महाऊसवर सेंद्रीय शेतीचा प्रयोग सुरु केला आहे. धोनीने यादरम्यान कोणत्याही जाहीराती न करण्याचा निर्णय घेत शेतीकडे लक्ष देण्याचं ठरवलं आहे. यासोबतच धोनी स्वतःचा नैसर्गिक खतांचा ब्रँड बाजारात आणण्याची तयारी करतो आहे. धोनीचा जवळचा मित्र मिहीर दिवाकर याने पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली.

अवश्य पाहा – ७ एकराच्या जागेवर उभं आहे धोनीचं रांचीमधलं अलिशान फार्महाऊस

“धोनीच्या देशभक्तीबद्दल कोणाच्याही मनात शंका नाहीये, ती त्याच्या रक्तातच आहे. मग तो भारतीय सैन्यासाठी काम करत असताना असो किंवा शेती करताना…प्रत्येक काम तो मेहनतीने करतो. धोनीच्या नावावर अंदाजे ४०-५० एकर शेत जमीन आहे, या शेतीवर तो सध्या पपई, केळी यासारखी फळं सेंद्रीय पद्धतीने पिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. काही महिन्यांपासून त्याने जाहीराती करणं थांबवलं असून, करोनानंतर परिस्थिती रुळावर आल्यानंतरही धोनी कोणतीही जाहीरात करणार नाहीये.” मिहीर दिवाकरने माहिती दिली.

वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला धोनी आयपीएलमधून पुनरागमन करणार होता. पण करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सर्व गोष्टी फिस्कटल्या आणि धोनीचं पुनरागमन लांबणीवर पडलं. आपला वाढदिवसही धोनीने परिवारासोबत अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केल्याचं मिहीरने सांगितलं. मिहीर आणि धोनी हे लहानपणापासूनचे मित्र असतून तो धोनीचा मॅनेजरही आहे. आपण बोलत असताना, कधीही क्रिकेट किंवा निवृत्तीचा विषय मध्ये येत नसल्याचं मिहीरने सांगितलं. परंतू आयपीएल खेळण्यासाठी धोनी सज्ज होता, त्यादृष्टीने त्याने सरावही सुरु केला होता असं मिहीर म्हणाला.

अवश्य वाचा – Birthday Special Blog : या धोनीचं करायचं काय ??