आयपीएलचा तेरावा हंगाम जवळ येऊन ठेपलेला असताना चेन्नई सुपरकिंग्ज संघासमोरची अडचण वाढलेली आहे. संघातील दोन खेळाडू करोनाग्रस्त आढळले असून महत्वाचा खेळाडू सुरेश रैनाने स्पर्धेतून माघार घेतली आहे. रैनाच्या अनुपस्थितीत चेन्नई सुपरकिंग्ज संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी कोणी करायची हा प्रश्न आता ऐरणीवर येऊन ठेपला आहे. भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरच्या मते महेंद्रसिंह धोनीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावं.

अवश्य वाचा – रैनाच्या कायम पाठीशी आहे, वक्तव्याचा विपर्यास केला – एन.श्रीनीवासन

“तिसऱ्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करण्यासाठी धोनीकडे ही खूप चांगली संधी आहे. गेल्या वर्षभरापासून तो मैदानापासून दूर आहे. खालच्या क्रमांकावर येऊन कमी षटकं खेळण्याऐवजी यंदा तो तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. त्यामुळे धोनी तिसऱ्या क्रमांकावर आल्यानंतर त्याच्यानंतर केदार जाधव, ड्वॅन ब्राव्हो, सॅम करन असे फलंदाज चेन्नईकडे आहेत. त्यामुळे माझ्यामते धोनीसाठी ही खूप चांगली संधी आहे. त्यात रैनाच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर चेन्नईला अनुभवी फलंदाजाची गरज लागणार आहे. ती गरज धोनी पूर्ण करु शकतो.” गंभीर Star Sports वाहिनीच्या Cricket Connected कार्यक्रमात बोलत होता.

१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होते आहे. चेन्नईचे दोन खेळाडू करोनाग्रस्त आढळल्यामुळे संघाचा क्वारंटाइन कालावधी वाढवण्यात आला आहे. याच कारणामुळे आयपीएल गव्हर्निंग काउन्सिल आणि बीसीसीआयने अद्याप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार चेन्नईला यंदा सलामीचा सामना खेळण्याची संधी मिळणार नाही, त्यांच्याजागी मुंबई विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सलामीचा सामना रंगू शकतो.

अवश्य वाचा – Video : CSK च्या गोटात करोनाचा शिरकाव, काय आहेत BCCI चे नियम??