दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने भारतावर ४० धावांनी मात करुन तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारताला विजयासाठी १९७ धावांची गरज होती. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची आघाडीची फळी ट्रेंट बोल्टच्या माऱ्यापुढे पुरती कोलमडली. भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, १० व्या षटकानंतर धोनीने मैदानात स्थिर होण्यासाठी प्रचंड संथ खेळ केला. याचा फायदा उचलत न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताला सामन्यात बॅकफूटला ढकलत ४० धावांनी बाजी मारली.

अवश्य वाचा – धोनीनं टी-२० क्रिकेट खेळण्याबाबत फेरविचार करावा- व्ही.व्ही.एस. लक्ष्मण

या पराभवानंतर महेंद्रसिंह धोनीच्या संघातील जागेवरुन पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. सामन्यात ज्यावेळी वेगाने धावा करणं गरजेचं होतं, त्यावेळी धोनीने स्थिर होण्यासाठी संथ खेळ केला. यामुळेच भारताला निर्धारित षटकांमध्ये १९७ धावांचं लक्ष्य पार करता आलं नाही. त्यामुळे आगामी काळात महेंद्रसिंह धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये इतर खेळाडूंना संधी द्यायला हरकत नाही, असं मत भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने व्यक्त केलं. टी-२० साठी भारतीय संघाला धोनीसाठी पर्याय शोधणं गरजेचं असल्याचं म्हणत लक्ष्मणने वन-डे सामन्यासाठी धोनी अजूनही योग्य खेळाडू असल्याचं म्हटलं होतं.

अवश्य वाचा – निर्णायक लढतीत धोनीवर लक्ष

यानंतर भारताचा माजी सलामीवीर क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही लक्ष्मणची री ओढली आहे. संघात आपली जागा कुठे आहे हे धोनीने ओळखावं. याचसोबत संघव्यवस्थापनानेही त्यांना धोनीकडून नेमकं काय अपेक्षित आहे हे देखील सांगणं गरजेचं आहे. ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत विरेंद्र सेहवागने आपलं मत व्यक्त केलं. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना धोनीने आपल्या शैलीत बदल करायला हवेत. फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर पहिल्या चेंडुपासून धोनीला फटकेबाजी करावी लागेल. त्यामुळे आगामी काळात संघात आपली जागा नेमकी कुठे आहे आणि संघात आपली नेमकी भूमिका काय याचा धोनीने स्वतःहून विचार करणं गरजेचं असल्याचं विरेंद्र सेहवाग म्हणाला.

मात्र, अशा परिस्थितीतही विरेंद्र सेहवागने धोनीची संघातील जागा अबाधित असल्याचं म्हटलंय. एकदिवसीय प्रकारासह टी-२० क्रिकेटमध्येही धोनीची भारतीय संघाला गरज आहे. योग्यवेळ येताच धोनी निवृत्ती घेईल. तो कोणत्याही तरुण खेळाडूची जागा अडवणार नाही, असं म्हणत सेहवागने धोनीला आपला पाठिंबा दर्शवला आहे. आज तिरुअनंतपुरमच्या मैदानात अखेरचा टी-२० सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात बाजी मारुन कोणता संघ मालिका खिशात घालेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

अवश्य वाचा – धोनीला टी-२० सोडण्याचा सल्ला देणाऱ्यांना भूवीचा शाब्दिक यॉर्कर