कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या तडकाफडकी निवृत्तीचे कवित्व अद्याप कायम आहे. धोनी खेळाडू म्हणून संघात हवा होता, असे मत माजी क्रिकेटपटूंनी प्रकट केले आहे. धोनीच्या निवृत्तीबाबतच्या तर्कवितर्काच्या पाश्र्वभूमीवर भारतीय संघ बुधवारी सिडनीला दाखल झाला.
कसोटी क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय क्रिकेटमध्ये घडणाऱ्या घडामोडींबाबत मात्र भारतीय संघ व्यवस्थापन कमालीची गुप्तता बाळगत आहे. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेतही धोनीने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद टाळून तो संघासोबत हॉटेलला गेला.
परदेशातील खराब कामगिरीमुळे धोनीवरील दडपण वाढत होते. याच कारणास्तव ३३ वर्षीय धोनीने निवृत्तीचा मार्ग पत्करल्याचे म्हटले जात आहे. परंतु त्याच्या तडकाफडकी निवृत्तीचे गूढ अद्याप कायम आहे. भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण चांगल नाही. त्यामुळे धोनीला कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडायला लागले, हीसुद्धा चर्चा जोरात आहे.
याबाबत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला की, ‘‘कर्णधारपद सोडण्याचा निर्णय योग्य आहे, परंतु कसोटी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय अयोग्य आहे.’’
‘‘मालिका सुरू असताना हा आश्चर्यकारक निर्णय कळल्यामुळे प्रामाणिकपणे मला अतिशय धक्का बसला. तीन कसोटी सामने झाले आहेत आणि आणखी एक फक्त बाकी होता. ही मालिका त्याने संपवायला हवी होती,’’ असे गांगुली पुढे म्हणाला.
भारताचे माजी संघनायक सुनील गावस्कर म्हणाले की, ‘‘सिडनी सामन्यानंतर धोनी कर्णधारपद सोडेल, अशी माझी अपेक्षा होती. परंतु तो खेळाडू म्हणून कसोटी सोडेल, असे वाटले नव्हते. अजून दोन-तीन वष्रे तो सहजपणे कसोटी खेळू शकला असता.

धोनी ऑस्ट्रेलियातच
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मायदेशी परतत असल्याच्या वृत्ताचा बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी इन्कार केला आहे. धोनी सिडनी कसोटी संपेपर्यंत म्हणजेच १० जानेवारीपर्यंत भारतीय संघासोबत असेल, असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले. ‘‘यष्टीरक्षक वृद्धिमान साहाव्यतिरिक्त धोनी हाच पर्याय सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्था म्हणून धोनीला ऑस्ट्रेलियात थांबण्यास सांगण्यात आले आहे,’’ असे पटेल म्हणाले.