टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचं कौतुक करत त्याने आपल्याला संघातील भविष्याबद्दल खरं चित्र समाजवून देण्यास मदत केल्याचं म्हटलं आहे. २०१९ विश्वचषकादरम्यान संघ निवडीवेळी निवड समिती माझा विचार करत नाहीये हे धोनीने युवराजला समजावलं होतं.

“मी ज्यावेळी संघात पुनरागमन केलं त्यावेळी विराटने मला पाठींबा दिला. त्याचा पाठींबा नसता तर मी पुनरागमन करुच शकलो नसतो. पण धोनीने मला खऱ्या अर्थाने माझं भविष्य काय आहे हे सांगितलं. २०१९ विश्वचषकासाठी माझा विचार केला जात नाहीये हे त्याने मला समजावून सांगितलं. त्याला जेवढं शक्य होतं तेवढी मदत त्याने मला केली.” युवराज सिंह News18 वाहिनीशी बोलत होता. २०१९ विश्वचषकाप्रमाणे २०१५ सालच्या स्पर्धेसाठीही युवराजला संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. २०१५ विश्वचषकाआधी युवराजने स्थानिक स्पर्धेत दोन शतकं झळकावली असतानाही त्याचा संघात विचार केला गेला नाही.

यावर बोलत असताना युवराज म्हणाला, “२०१५ च्या विश्वचषकादरम्यान मी आजारपणातून सावरत होतो. खेळ बदलला होता आणि सर्वच गोष्टी बदलल्या होत्या. त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेण्यात थोडा वेळ जाणार होता हे मला माहिती होतं. म्हणून २०१५ साली मला संघात स्थान मिळालं नाही यासाठी मी कोणालाही दोष देऊ इच्छित नाही. २०११ विश्वचषकापर्यंत धोनीला माझ्यावर विश्वास होता. तू माझा महत्वाचा खेळाडू आहेस असं तो मला म्हणायचा. त्यामुळे कर्णधार या नात्याने तुम्ही कधीकधी प्रत्येक गोष्टीचं कारण देऊ शकत नाही, कारण सरतेशेवटी देशासाठी खेळत असताना संघ कशी कामगिरी करतो हे देखील महत्वाचं आहे.” २००० साली वयाच्या १८ व्या वर्षी युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. २०१७ साली तो भारताकडून आपला अखेरचा सामना खेळला.