टीम इंडियाचा माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे ‘बाईक’ (दुचाकी) प्रेम कुणापासून लपलेले नाही. रांची येथील त्याच्या फार्महाऊसमध्ये दुचाकींनी भरलेले गॅरेज आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) नेतृत्व करतो. याच CSK ने धोनीचा एक नवा व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये धोनी आपल्या नव्या वाहनावर बसून फेरफटका मारण्याचा आनंद घेताना दिसला. हे वाहन म्हणजे बाईक किंवा कार नव्हती, धोनी चक्क ट्रॅक्टर चालवत होता. सीएसकेने ट्विटरवर धोनीचा ट्रॅक्टर चालविण्याचा आनंद घेतनाचा व्हिडिओ पोस्ट केला. ” #थाला धोनी आपल्या नव्या वाहनावर आरूढ होऊन राजा सरांना भेटला!”, असे कॅप्शनही पोस्टखाली लिहिले.

यापूर्वी, धोनीची पत्नी साक्षीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये धोनी आपली मुलगी झीवा हिच्यासोबत फार्महाऊसमध्ये बाईक राइडचा आनंद घेत होता. कोरोना व्हायरसमुळे लागू झालेल्या लॉकडाऊन दरम्यान इतर क्रिकेटर्स सोशल मीडियावर लाइव्हच्या माध्यमातून भेटीस येतात. पण धोनी मात्र आपल्या कुटुंबाला वेळ देत आहे. रविवारी CSK च्या अधिकृत हँडलवर रूपा रमानी या महिला अँकरसोबत साक्षीने इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी तिने धोनीविषयी खूप काही सांगितले.

लॉकडाउन काळात धोनी काय करतो? या प्रश्नावरही साक्षीने उत्तर दिलं. “धोनीकडे ९ बाईक आहेत. तो त्या बाईक उघडतो. त्याने काही पार्ट्स आणले आहेत. ते पार्ट्स तो बाईकला लावतो. मध्यंतरी तो स्वत: पूर्णपणे एक बाईक बनवत होता. त्याने सुरूवात केली आणि पूर्ण बाईक बनवून तयार पण केली. पण तेवढ्यात त्याला लक्षात आलं की त्याने एक पार्ट लावलाच नाही. मग त्याने पुन्हा सगळी बाईक पुन्हा उघडली आणि सगळं परत करत बसला”, असा मजेशीर किस्सा साक्षीने सांगितला.

याशिवाय, लॉकडाऊन संपल्यावर तिला धोनीबरोबर ट्रेकिंगला जायला आवडेल असं साक्षीने सांगितलं आणि महत्त्वाचे म्हणजे करोनानंतर सुरक्षेच्या कारणास्तव तिला विमानप्रवासाऐवजी ‘रोड ट्रिप’ करायची आहे, असेही ती म्हणाली.