X
X

निवृत्तीबद्दल विचारल्यावर धोनीला राग येतो, जवळच्या मित्राने दिली माहिती

READ IN APP

धोनी स्वतःच्या तंदुरुस्तीकडे देतोय लक्ष

इंग्लंडमध्ये पार पडलेल्या २०१९ विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं. न्यूझीलंडने भारतावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या पराभवानंतर एम.एस.के. प्रसाद यांच्या तत्कालीन निवड समितीने धोनीला विश्रांती देत ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान दिलं. त्या दिवसापासून आतापर्यंत धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मध्यंतरीच्या काळात वारंवार संधी मिळूनही ऋषभ पंत यष्टीरक्षण आणि फलंदाजीत खराब कामगिरी करत होता. यावेळी सोशल मीडियावर धोनीला परत संघात स्थान देण्याची मागणी चाहत्यांकडून होत होती, मात्र भारतीय संघ व्यवस्थापनाने लोकेश राहुलकडे यष्टीरक्षण दिलं.

धोनी निवृत्ती कधी घेणार याविषयी अद्याप चर्चा सुरु आहेत. तरीही धोनीच्या मनात अद्याप निवृत्तीचा विचार आलेला नाही. धोनीच्या एका जवळच्या मित्राने ABP News वाहिनीशी बोलत असताना याबद्दल माहिती दिली. “माहीला निवृत्तीबद्दल विचारलं की राग येतो, त्याच्यामते तो अजुनही सर्वात तंदुरुस्त यष्टीरक्षक आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये तो स्वतःच्या तंदुरुस्तीवर अधिक भर देत होता. मी याआधी त्याला इतका सराव करताना कधीच पाहिलं नव्हतं. वय हे त्याच्या हातात राहिलेलं नाही हे त्याला माहिती आहे. त्यामुळे अधिकाधीक सराव हाच त्याला संघात कायम राखू शकतो हे देखील तो जाणून आहे. कोणाचाही पाठींबा नसताना त्याने स्वतःला सिद्ध करुन दाखवलंय. सध्या त्याला अनेक चाहत्यांचा पाठींबा आहे, त्यामुळे तो भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी नक्की प्रयत्न करेल.”

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ टी-२० आणि २०११ वन-डे असे दोन विश्वचषक जिंकले आहेत. मात्र २०१९ सालापासून धोनीची फलंदाजी ही काहीशी संथ झाली होती. अनेक महत्वाच्या सामन्यात धोनी धावा करु शकला नव्हता. त्यामुळे सोशल मीडियावर धोनीने आता निवृत्ती स्विकारावी अशी मागणी चाहते आणि अनेक माजी खेळाडूंनी केली होती. इंग्लंडमधील विश्वचषक पराभवानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणार असं वाटत असतानाच, धोनीने निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलला होता. सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे धोनीला पुन्हा मैदानात उतरण्याची संधी मिळते का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

22
X