वन-डे मालिकेत ५-१ असा विजय संपादन केल्यानंतर भारताने पहिल्या टी-२० सामन्यातही दक्षिण आफ्रिकेला पराभवाचं पाणी पाजलं. या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या नावावर एक विक्रम जमा झाला आहे. श्रीलंकेच्या कुमार संगकाराला मागे टाकत धोनी आता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा यष्टीरक्षक ठरला आहे.

अवश्य वाचा – महेंद्रसिंह धोनी संघाचा अविभाज्य भाग, त्याला पर्याय नाही – किरण मोरे

२५४ सामन्यांमध्ये संगकारांच्या नावावर १३३ झेल जमा आहेत. कालच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर रेझा हेंड्रिक्सचा झेल पकडत धोनीने आपल्या टी-२० कारकिर्दीतला १३४ वा झेल पकडला. या यादीत दिनेश कार्तिक तिसऱ्या, पाकिस्तानचा कामरान अकमल चौथ्या तर वेस्ट इंडिजचा दिनेश रामदिन चौथ्या स्थानावर आहे. (ही कामगिरी आंतरराष्ट्रीय सामने, आयपीएल आणि स्थानिक टी-२० सामन्यांमधली मिळून देण्यात आलेली आहे.)

दरम्यान पहिल्या टी-२० सामन्यात अन्य भारतीय खेळाडूंनीही काही विक्रमांची नोंद केली –

  • टी-२० क्रिकेटमध्ये ५ बळी घेणारा भुवनेश्वर कुमार पहिला जलदगती भारतीय गोलंदाज ठरला आहे. युझवेंद्र चहलनंतर टी-२० सामन्यांत ५ बळी घेणारा भुवनेश्वर दुसरा गोलंदाज ठरला आहे.
  • टी-२०, वन-डे आणि कसोटी अशा तिनही प्रकारात ५ बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
  • आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत सर्वाधिक वेळा २०० पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य देणाऱ्या संघाच्या यादीत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. दक्षिण आफ्रिकेने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना ११ वेळा तर ऑस्ट्रेलियाने १० वेळा २०० पेक्षा जास्त धावसंख्येचं आव्हान दिलं आहे.
  • भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावांची नोंद करण्यात आलेली आहे. पहिल्या ६ षटकात भारताने कालच्या सामन्यात ७८ धावा पटकावल्या होत्या.