क्रिकेट सामन्यात प्रत्येक धाव महत्त्वाची असते. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही याचा प्रत्यय आला. फक्त चार चेंडू शिल्लक राखत भारताने दुसरा एकदिवसीय सामना जिंकला. एकीकडे कर्णधार विराट कोहलीने निर्णायक शतकी खेळी केली तर दुसरीकडे महेंद्रसिंग धोनीने भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. सामना जिंकल्यानंतर अनेकांनी धोनीचं कौतुक करत धोनी अभी जिंदा है अशा स्वरुपाच्या पोस्ट टाकण्यास सुरुवात केली. पण धोनीने सामन्यात एक मोठी चूक केली होती जी पंचांच्या लक्षात आली नाही अन्यथा सामन्याचा निकाल वेगळा असता.

महेंद्रसिंग धोनीने धाव पूर्णच केली नव्हती. पण हे पंचांच्या लक्षातच आलं नाही. अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत सामना जिंकून देणाऱ्या धोनीची ही चूक भारतीय संघाला महागात पडण्याची शक्यता होती. सामना अटीतटीवर आला असताना हा प्रकार घडला. 45 व्या ओव्हरला नेथन लायन गोलंदाजी करत असताना अखेरच्या चेंडूवर एक धाव घेण्यासाठी धोनीने चेंडू टोलावला आणि धाव घेतली होती.

पण यावेळी धोनी निर्धारित रेषेत न पोहोचताच माघारी फिरतो. ओव्हर संपत असल्याने धोनी बॅट न टेकवताच दिनेश कार्तिकशी चर्चा काढण्यासाठी लगेच मागे फिरताना दिसत आहे. पंचांसहित ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांच्याही लक्षात ही गोष्ट येत नाही. सोशल मीडियावर धोनीचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीचे धडाकेबाज शतक (१०४ धावा) आणि महेंद्रसिंह धोनीच्या (५५ धावा) अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ४ चेंडू व ६ विकेट राखून विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 ने बरोबरी केली आहे.