दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गड्यांनी पराभव करत मालिकेत १-१ बरोबरी साधली. या सामन्यात भारताकडून आजी-माजी कर्णधारांनी निर्णायक खेळी केली. विराट कोहलीने शतकी तडाखा लावला तर धोनीने अर्धशतक करत फिनिशरची भूमिका चोख बजावली. धोनी-कोहली जोडीने चौथ्या विकेटसाठी ८२ धावांची भागिदारी केली. फलंदाजी करत असताना धोनी सतत बोलत होता, त्याचा फलंदाजी करताना मदत झाल्याचे मत भारतीय कर्णधा विराट कोहलीने व्यक्त केले. दुसऱ्या बाजूला धोनी असल्यामुळे मला आक्रमक फलंदाजी करता आली असेही कोहली म्हणाला.

गेल्या काही दिवसांपासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे आणि लगेच त्याच्याकडून आक्रमक खेळीची आपेक्षा करणे चूकिचे आहे. येथील परिस्थितीशी जुळवून घेण्यास धोनीला वेळ जाईल. त्यामुळे धोनीवर टीका करणे चूकीचे असल्याचे विराट म्हणाला. पुढे बोलताना विराट म्हणाला की, दुसऱ्या सामन्यात दमदार फलंदाजी करत धोनीने टीकाकारांची तोंड बंद केली आहेत. धोनीसारखा अनुभवी खेळाडू खेळपट्टीवर असतो तेव्हा खूप मदत मिळते. त्याच्याशी सतत चर्चा करून रणनीती ठरवत होतो. फलंदाजी करताना त्याने मला घाई न करण्याचा सल्ला दिला. अखेरपर्यंत थांबून सामना जिंकू, असे तो म्हणाला. मधल्या काही षटकांत मी जोखीम उचलली, पण धोनीचं समोर असणं माझ्यासाठी महत्त्वाचे होते, असे कोहली म्हणाला.