करोना विषाणूच्या दणक्याने सर्व जग लॉकडाउन झालं. भारतात होणारी IPL ही सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. सर्वप्रथम ही स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार होती. त्यानुसार काही दिवस आधी विविध संघाचे खेळाडू सराव सत्रासाठी आपापल्या संघात दाखलदेखील झाले होते. चेन्नईच्या संघाने csk चा सराव कॅम्प लावला होता आणि जुन्या खेळाडूंपासून नव्या खेळाडूंपर्यंत सारेच या कॅम्पमध्ये होते. याच कॅम्पबद्दल एक गमतीदार प्रसंग चेन्नईने यंदा विकत घेतलेला फिरकीपटू पियुष चावला याने सांगितला.

चेन्नईच्या सराव सत्रासाठी धडाकेबाज खेळाडू महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना उपस्थित होते. फलंदाजीचा सराव सुरू होता. त्यावेळी पियुष चावलाला फलंदाजीसाठी बोलवण्यात आले. पियुष चावलाने सुरुवातीला बचावात्मक खेळ करायला सुरुवात केली. त्यावेळी धोनीने त्याला सांगितलं की तुला फटकेबाजी करावी लागेल. तो म्हणाला की तुम्ही ज्या प्रकारची फटकेबाजी करता, तसं मला जमणं कठीण आहे. त्यावर धोनी त्याला म्हणाला की एकेरी धाव तर तू घेऊ शकतोस हे मला पण महिती आहे, पण तुला फटकेबाजी तर करावीच लागेल. धोनीने असं सांगितल्यावर मग पियुष चावलाकडे काही पर्यायच उरला नव्हता. त्यानंतर उरलेल्या सरावात पियुष चावलाने फटकेबाजी करत फलंदाजी केली.

स्वतः पियुष चावलाने या संदर्भातील एक नेटच्या सरावाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्याने हा धोनीचं किस्सा सांगितला आहे.