आयपीएलच्या क्लालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सवर मात केल्यानंतर रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली. आयपीएलच्या अंतिम फेरीत पुण्याने प्रवेश केला आहे. रविवारी होणाऱ्या सामन्यात धोनीने मैदानात पाऊल टाकताच सर्वाधिक वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत खेळणारा खेळाडू म्हणून त्याची नोंद होईल.

आयपीएलच्या दहा पर्वांमध्ये धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपरकिंग्जचा संघ सहा वेळा अंतिम फेरीत पोहोचला होता. मॅच फिक्सिंग प्रकरण पुढे आल्यानंतर चेन्नईच्या संघावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. त्यानंतर धोनी गेल्या वर्षी आणि यंदा पुण्याच्या संघाकडून खेळत आहे. चेन्नई सुपरकिंग्जने २००८, २०१०, २०११, २०१२ आणि २०१५ साली आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या सहा वर्षांत चेन्नईकडून धोनीसोबतच सुरेश रैना देखील खेळला आहे. पण रैना सध्या गुजरात लायन्स संघाचे नेतृत्त्व करत आहे. गुजरात लायन्सला अंतिम फेरीपर्यंत मजल मारता आली नाही. त्यामुळे पुण्याकडून खेळून धोनी पुन्हा एकदा यंदा अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आहे. रैना आणि धोनीनंतर एस.बद्रीनाथ, आर.अश्विन आणि मोर्ने मॉर्केल हे चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू पाच वेळा अंतिम फेरीत खेळले आहेत.