आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर महेंद्रसिंह धोनी पहिल्यांदा क्रिकेटच्या मैदानात उतरला तो आयपीएलच्या तेराव्या हंगामात. १० नोव्हेंबरला आयपीएलचा अंतिम सामना पार पडल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. चेन्नई सुपरकिंग्जची आयपीएलच्या तेराव्या हंगामातली कामगिरी फारशी चांगली झालेली नाही, सध्या गुणतालिकेत हा संघ तळाशी आहे. धोनीलाही यंदा आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम संपल्यानंतर धोनी पुढे काय करणार असा प्रश्न सर्वांना पडला होता.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, बिग बॅश लिग स्पर्धेतील काही संघ महेंद्रसिंह धोनीसह सुरेश रैना, युवराज सिंह यासारख्या काही खेळाडूंना आपल्या संघात सहभागी करवून घेण्यासाठी उत्सुक आहेत. बिग बॅश लिगच्या व्यवस्थापनाने यंदाच्या हंगामापासून प्रत्येक संघात दोन परदेशी खेळाडूंऐवजी ३ परदेशी खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बिग बॅशमधील संघ आता भारतीय खेळाडूंना संधी देण्यासाठी उत्सुक असल्याचं समजतंय.

बीसीसीआयशी संलग्न असलेल्या खेळाडूंना बाहेरील देशांमधील टी-२० लिगमध्ये सहभागी होता येत नाही. भारतीय संघातून निवृत्त झालेल्या आणि बोर्डाने परवानगी दिलेल्या खेळाडूंनाच परदेशी टी-२० लिगमध्ये खेळण्याची संधी मिळते. युवराज सिंहने निवृत्तीनंतरच बाहेरील लिगमध्ये खेळण्यास सुरुवात केली. धोनी आणि रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही ते आयपीएलशी निगडीत आहेत. त्यामुळे बीसीसीआय त्यांना परवानगी देईल का याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. डिसेंबर महिन्यापासून बिग बॅश लिगच्या नवीन पर्वाला सुरुवात होणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : कामगिरी शून्य पण कमाई रग्गड, जाहीरातींमधून धोनी कमावतोय कोट्यवधी रुपये