विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळतो आहे. टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारल्यानंतर कसोटी मालिकेवरही भारताने आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. एकीकडे धोनीच्या अनुपस्थितीत संघात संधी मिळालेल्या ऋषभ पंतकडून सतत निराशा पदरी पडत असताना, धोनीने गुरुवारी रांचीत मैदानात सराव केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करतो की काय अशा चर्चांना उधाणं आलं होतं.

अवश्य वाचा – Video : सुट्टीवर गेलेल्या धोनीचं पुनरागमन, मैदानात कसून सराव

मात्र बीसीसीआयने धोनीच्या पुनरागमनाबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. “विंडीजविरुद्ध मालिकेसाठीही धोनी उपलब्ध नसेल”, BCCI च्या अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली. काही दिवसांपूर्वी एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने धोनीचा आगामी मालिकांसाठी विचार केला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. अनेक प्रसारमाध्यमांमध्ये अशा बातम्याही आल्या होत्या.

बांगलादेश दौऱ्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर विंडीजविरुद्ध मालिका खेळणार आहे. ६ डिसेंबरपासून विंडीजच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार असून या दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे. ६ ते २२ डिसेंबर या कालावधीमध्ये हा दौरा रंगेल, २०१९ वर्षातला भारतीय संघाची ही अखेरची मालिका असणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : चाहता म्हणाला, CSK धोनीला अलविदा करणार ! चेन्नई सुपरकिंग्जने दिलेलं उत्तर एकदा वाचाच