भारताचा माझी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजल्यानंतर इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपण निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. धोनीच्या निवृत्तीनंतर अनेक चर्चांना उधान आले आहे. निवृत्तीनंतर धोनीची ब्रँड व्हॅल्यू कमी होत असल्याची देखील चर्चा आहे. मात्र यावर धोनीचा मित्र आणि व्यवसाय भागीदार असलेल्या अरुण पांडे याने खुलासा केला आहे. निवृत्तीच्या निर्णयामुळे त्याचे ब्रँड व्हॅल्यू कमी होत असल्याचे त्याने नाकारले आहे. तसेच धोनी आता सेवानिवृत्त झाल्यावर लष्करासोबत बराच वेळ घालवणार आहे असे पीटीआयशी बोलताना त्यांनी सांगितले. २०१९ विश्वचषक उपांत्य फेरीमध्ये पराभव झाल्यानतर महेंद्रसिंग धोनीने पॅराशूट रेजिमेंटबरोबर एक महिन्यापेक्षा जास्त काळ प्रशिक्षण घेतले होते.

या वर्षी होणारा टी २०वर्ल्ड कप २०२२ पर्यंत पुढे ढकलल्यानंतर धोनी यावर्षीच आपली निवृत्ती जाहीर करणार हे माहित होते मात्र १५ ऑगस्ट रोजी करेल याची कल्पना नव्हती. तसाही तो त्याचा निर्णय होता. धोनीने आयपीएल २०२० साठी तयारी सुरूही केली होती. मात्र करोनामुळे आयपीएलचे सामने रद्द करावे लागले त्यानंतर टी २०वर्ल्ड कपही रद्द करण्यात आला. तो मानसिकरित्या मुक्त होण्याचा विचार करत असावा अशी माहिती अरुण पांडे याने दिली.

“१५ ऑगस्ट हा लष्करासाठी खास दिवस असल्याने त्याने याच दिवशी निवृत्ती जाहीर करण्याचा विचार केला असावा. तसेच टी -२० वर्ल्डकप पुढे ढकलला गेला ही सुद्धा त्याच्या निवृत्तीसाठी निश्चितच कारण होते,”  असे पांडे म्हणाले.

लष्करामध्ये धोनीकडे लेफ्टनंट कर्नलचे पद आहे. २०१९ विश्वचषक उपांत्य फेरीनंतर त्याने पॅराशूट रेजिमेंटबरोबर एका महिन्यापेक्षा जास्त काळ प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे एक गोष्ट निश्चितच आहे, तो सैन्याबरोबर अधिक वेळ घालवणार आहे. तो आपल्या इतर व्यावसायिक गोष्टींना देखील वेळ देईल. आम्ही लवकरच एकत्र बसून पुढचा मार्ग ठरवू, असे पांडे यांनी सांगितले