इंग्लंडमध्ये २०१९ साली पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. या स्पर्धेत धोनीचा संथ खेळ हा चर्चेचा विषय बनला होता. यानंतर धोनी तब्बल वर्षभर भारतीय संघाबाहेर आहे. निवड समितीने विश्वचषक स्पर्धेनंतर ऋषभ पंतला संधी देण्याचं ठरवलं. आयपीएलच्या तेराव्या हंगामातून धोनी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार होता, परंतू करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे धोनीचं हे पुनरागमन लांबलं. धोनी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार की निवृत्ती स्विकारणार हा अजुनही चर्चेचा विषय असतो. पण धोनी २ जुलैपासून एका नव्या अवतारात दिसणार आहे.

मुंबई मिरर वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, धोनी आता प्रशिक्षणाकडे वळणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू डॅरल कुलिननच्या क्रिकेट अकादमीत धोनी Director of coaching म्हणून काम पाहणार आहे. “क्रिकेट प्रशिक्षणात रस असलेल्या खेळाडूंना सर्व तांत्रिक गोष्टी समजावून सांगण्यासाठी आमच्या अकादमीत विशेष सोय आहे. आतापर्यंत २०० पेक्षा जास्त प्रशिक्षक आमच्या अकादमीतून नव्या गोष्टी शिकून गेले आहेत. २ जुलैपासून आम्ही खेळाडूंसाठी ऑनलाईन कोचिंग सुरु करणार आहोत. मैदानात त्यांना नेमक्या गोष्टींची गरज आहे या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन केलं जाईल. या सर्व प्रोजक्टचा प्रमुख धोनी असेल, तो खेळाडूंना मार्गदर्शन करण्यापासून इतर तज्ज्ञ मंडळींचं मार्गदर्शन घडवण्यात मदत करेल.” अकादमीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई मिरर शी बोलताना माहिती दिली.

२०१७ साली धोनीने दुबईत एक अकादमी सुरु केली होती, परंतू आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे तो या अकादमीकडे लक्ष देऊ शकला नाही. अखेरीस मागच्या वर्षी ही अकादमी बंद करण्याचा निर्णय धोनीने घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने अद्याप निवृत्ती घेतलेली नाही, त्याच्याकडे अद्याप प्रशिक्षणाचा अनुभव नसला तरीही झारखंडच्या संघाला धोनी नेहमी मार्गदर्शन करत असतो. अनेकदा झारखंडच्या संघासोबत धोनीने सरावही केलाय. याव्यतिरीक्त चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यातही धोनीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे नवीन जबाबदारीत धोनी कसं काम करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.