बीसीसीआयचे पायउतार झालेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पनच्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्स संघातील भूमिकेसंदर्भात महेंद्रसिंग धोनीने मांडलेली भूमिका मुदगल अहवालाशी विसंगत ठरली आहे.
‘‘मयप्पन निव्वळ क्रिकेटप्रेमी आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये त्याचा समावेश नाही,’’ असे धोनीने मुदगल समितीसमोर सांगितले होते. दरम्यान, मुदगल समितीने सर्वोच्च न्यायालयाला सादर करण्यात आलेल्या पहिल्या अहवालानुसार मयप्पनचे इंडिया सिमेंट्स कंपनीत कोणतेही समभाग नाहीत. तसेच चेन्नई सुपर किंग्स संघात त्याची कोणतीही भूमिका नाही. कर्णधार महेंद्रसिंग धोनी, श्रीनिवासन आणि इंडिया सिमेंट्सच्या पदाधिकाऱ्यांनी मयप्पनचा चेन्नई सुपर किंग्सच्या कामकाजात कोणताही सहभाग नसल्याचे समितीला सांगितले होते.
समितीने सादर केलेल्या अंतिम अहवालात मात्र मयप्पन निव्वळ क्रिकेटप्रेमी म्हणून वावरत नव्हता. तर मयप्पन हॉटेलमधील खोलीत एका व्यक्तीला भेटत होता. ध्वनी-समानता आणि सुरक्षारक्षकांनी दिलेली साक्ष, यानुसार चेन्नई सुपर किंग्स संघाशी संलग्न व्यक्ती स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजीशी संलग्न असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मयप्पन याप्रकरणी आणखी गोत्यात आला आहे. धोनीने समितीसमोर मांडलेली भूमिका चुकीची ठरल्याने उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यासंदर्भात भाष्य करण्यास न्यायाधीश मुदगल यांनी नकार दिला.
‘मयप्पन आपल्या हॉटेलमध्ये हा एका व्यक्तीची (नाव जाहीर केले नाही) सातत्याने भेट घेत होता. त्यामुळे मयप्पन याचे त्या व्यक्तीशी सातत्याने संपर्कात होता, हे उघड होते,’’ असे निरीक्षण मुदगल समितीच्या सोमवारी जाहीर झालेल्या अहवालात नोंदवण्यात आले आहे.