भारतीय संघ विंडिज दौऱ्यावर असताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मात्र या दौऱ्यातून माघार घेतली होती. तो भारतीय जवानांसोबत काश्मीर खोऱ्यात गस्त घालत होता. ३१ जुलैपासून त्याने काश्मीर खोऱ्यातील १०६ TA बटालियन (पॅरा) सोबत भारतीय सैन्यात सेवा देण्यास सुरू केली होती. सुमारे २ महिन्यांनंतर तो स्वगृही परतला. त्यावेळी कार आणि बाईकवर नितांत प्रेम असलेल्या धोनीने आपल्या नव्या कारमधून एक फेरफटका मारला. तो कार चालवत असताना आणि ड्रायव्हिंगचा मनमुराद आनंद लुटतानाचा फोटो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.

नव्या कारमधून फेरफटका मारताना धोनी

धोनी दोन महिन्यांसाठी भारतीय लष्करासोबत होता, त्यावेळी धोनीच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले होते. धोनीच्या घरी लाल जीप ग्रँड चेरोकी दाखल झाली होती. त्यामुळे साक्षीला धोनीची खूपच आठवण येत होती. तिने त्या कारचा फोटो पोस्ट करत त्या फोटोखाली धोनी, मला तुझी खूप आठवण येते असेही लिहिलेही होते.

दरम्यान, धोनीकडे लष्कराची लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी आहे. त्यानुसार त्याने प्राथमिक प्रशिक्षण घेऊन काश्मीरमधील नेमून दिलेल्या भागात गस्त घातली. त्यामुळे त्या काळात धोनी लष्कराच्या गणवेशात दिसला. त्याचे त्या भागातील फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले. याशिवाय कलम ३७० रद्द झाल्याने काश्नीर आणि आसपासच्या परिसराला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्याबाबतचा ३७० निर्णय घेतला गेला तेव्हादेखील धोनी जम्मू-काश्मीरमध्येच होता.