एकीकडे महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलेलं असलं तरीही त्याच्या लोकप्रियतेमध्ये तसूभरही फरक पडला नाहीये. yougov.in.uk या संकेतस्थळाने घेतलेल्या सर्व्हेमध्ये धोनीने सचिन आणि विराटला मागे टाकलं आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत धोनीने आपला पहिला क्रमांक आजही कायम राखला आहे.

yougov.in.uk संकेतस्थळाने घेतलेल्या सर्व्हेत तब्बल ४० लाख लोकांनी सहभाग घेतला होता. यामधून लोकप्रियतेच्या निकषांवर धोनीला ७.७ टक्के एवढं मतदान झालं असून क्रिडापटूंच्या यादीत त्याने पहिलं स्थान पटकावलं आहे. २०१८ वर्षाच्या सुरुवातीला yougov.in.uk ने सर्व्हे करण्यास सुरुवात केली होती. या सर्व्हेत भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ६.८ टक्क्यांसह दुसरा तर भारताचा कर्णधार विराट कोहलीने ४.५ टक्क्यांसह तिसरा क्रमांक पटकावला आहे.

धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने वन-डे विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं आहे. वन-डे मालिकेत धोनीला फलंदाजीत फारशी चमक दाखवता आली नाही. त्याच्या संथ खेळीवर सोशल मीडिया आणि माजी खेळाडूंनी टीकाही केली. मात्र या सगळ्या गोष्टींचा परिणाम धोनीच्या लोकप्रियतेवर झालेला दिसत नाहीये.