महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. सौरव गांगुली आणि राहुल द्रविडनंतर भारतीय संघाचं नेतृत्व अनपेक्षितपणे धोनीकडे आलं. धोनीनेही आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेत भारतीय संघाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. आजही सोशल मीडियावर सौरव गांगुली की महेंद्रसिंह धोनी अशी चर्चा आपल्याला वाचायला मिळते. भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरच्या मते वन-डे क्रिकेटमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनी हा गांगुलीपेक्षा चांगला कर्णधार होता.
“मर्यादीत षटकांच्या क्रिकेटबद्दल बोलायला गेलं तर धोनी हा गांगुलीपेक्षा चांगला कर्णधार होता. विशेषकरुन महत्वाच्या स्पर्धांचा निकष लावायला गेलो तर धोनी नक्कीच चांगला कर्णधार होता…टी-२० विश्वचषक, चॅम्पिअन्स ट्रॉफी, वन-डे विश्वचषक धोनीने कर्णधार म्हणून सर्व महत्वाच्या स्पर्धा भारताला जिंकवून दिल्या आहेत. कोणतीही महत्वाची स्पर्धा धोनीने सोडली नाही. एक कर्णधार म्हणून यापेक्षा चांगली कामगिरी असूच शकत नाही. त्यामुळे वन-डे क्रिकेटमध्ये धोनी हा गांगुलीपेक्षा चांगला कर्णधार होता याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही”, गंभीर Star Sports वाहिनीच्या Cricket Connected कार्यक्रमात बोलत होता.
महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीकडे भारतीय संघाचं नेतृत्व आलेलं आहे. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुरावलेला आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामापासून धोनी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार होता. परंतू करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे धोनीचं पुनरागमन लांबणीवर पडलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 13, 2020 2:26 pm