भारताचा अनुभवी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी हा एक यशस्वी कर्णधार आहे. त्याने भारतासाठी अनेक स्पर्धांची विजेतेपदं जिंकली. पण माजी फलंदाज गौतम गंभीर याच्या मते, धोनीला हे यश निव्वळ नशिबामुळे आणि गांगुलीच्या मेहनतीमुळे मिळालं आहे. “धोनी नशिबवान कर्णधार होता. २०११ च्या विश्वचषक संघाचे नेतृत्व करणं फारसं अवघड नव्हतं. संघात सचिन, सेहवाग, मी, युवराज, युसूफ, विराट सगळेच प्रतिभावंत खेळाडू होते. गांगुलीने या साऱ्यांना एकत्र घेऊन संघ घडवला आणि उभा केला. पण धोनीला मात्र ‘रेडीमेड’ संघ मिळाला आणि म्हणूनच त्याला एवढ्या साऱ्या ट्रॉफीज जिंकता आल्या”, असे स्पष्ट मत गंभीरने मांडले होते. धोनीवरील याच टीकेवरून गंभीरला माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने रोखठोक उत्तर दिलं.

“सौरव गांगुलीने देशाला अनेक मॅच-विनर खेळाडू दिले हे गंभीरचं म्हणणं योग्य आहे. मॅच फिक्सिंगच्या दलदलीत क्रिकेट अडकलं असताना गांगुलीकडे कर्णधारपद आलं होतं. त्या परिस्थितीतून त्याने संघ उभा केला आणि यशस्वी केला. पण म्हणून धोनीला कमी लेखून चालणार नाही. कारण माझ्या मते, धोनीकडे कर्णधारपद आल्यानंतर त्याचंही काम खूप कठीण होतं. (सारे अनुभवी आणि दिग्गज खेळाडू शांतपणे हाताळण्यासाठी) त्यावेळी धोनीसारख्या कर्णधाराचीच गरज होती. त्याने संघातील साऱ्या खेळाडूंना नीट पद्धतीने हाताळले आणि संघ भक्कम केला”, असं स्पष्ट मत त्याने व्यक्त केलं.

विराट कोहली याला धोनीनंतर कर्णधारपद देण्यात आले. स्वत: विराटने सांगितले होते की त्याला कर्णधारपद मिळण्यात धोनीची मदत झाली. याबाबतही आकाश चोप्राने मत मांडले. “विराटला जो संघ मिळाला, तो संघ हा धोनीप्रमाने भारावलेला आहे. मला वाटतं की दोन कर्णधारांमध्ये तुलना करणं चुकीचं आहे. कारण त्यातून मिळणारा निकाल हा बहुतेक वेळा चुकीचा असतो. गंभीरच्या धोनीबाबतच्या मताशी मी सहमत नाही”, असे तो म्हणाला.