लॉकडाउनपश्चात तब्बल ८ ते ९ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला पहिला वन-डे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. या सामन्यात भारतीय संघाला ६६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी पहिल्या डावात अतिशय निराशाजनक कामगिरी केली. फलंदाजीतही हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांचा अपवाद वगळता अन्य सर्व फलंदाज अपयशी ठरले.

भारतीय संघाच्या पहिल्या सामन्यातील कामगिरीबद्दल बोलत असताना वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू मायकल होल्डिंग यांनी विश्लेषण केलं आहे. “माझ्या मते भारतीय संघाला अजुनही धोनीची उणीव भासते आहे. यापुढे भारतीय संघाला धावसंख्येचा पाठलाग करणं नेहमी कठीण जाणार आहे. धोनीचा संघात नसल्याचा हा मोठा फटका भारतीय संघाला बसणार आहे. धावसंख्येचा पाठलाग करताना मधल्या फळीत येऊन डाव सावरण्याचं कसब धोनीकडे होतं. ज्यावेळी धोनी संघात होता त्यावेळी भारताने यशस्वीरित्या धावसंख्येचा पाठलाग केला आहे.” होल्डिंग आपल्या यु-ट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात बोलत होते.

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ३७५ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात आश्वासक झाली. शिखर धवन आणि मयांक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. हेजलवूडने अग्रवालला माघारी धाडत टीम इंडियाला पहिला धक्का दिला, त्याने २२ धावा केल्या. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरही ठराविक अंतराने माघारी परतले. एका क्षणाला टीम इंडियाची अवस्था ३ बाद ८० अशी होती. यानंतर भरवशाच्या लोकेश राहुलनेही निराशा करत माघारी परतण पसंत केलं. ४ बाद १०१ अशा संकटात सापडलेल्या टीम इंडियाला अखेरीस शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांनी सावरलं. दोन्ही फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी केली.

शिखर आणि हार्दिरक पांड्या भागीदारी करत असताना टीम इंडियाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतू फिरकीपटू झॅम्पाने टीम इंडियाची जमलेली जोडी फोडत ऑस्ट्रेलियाला पुन्हा पुनरागमन करुन दिलं. ७४ धावांची खेळी करत धवन बाद झाला. यानंतर हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतू झॅम्पाच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळताना तो देखील सीमारेषेवर स्टार्ककडे झेल देऊन माघारी परतला. पांड्याने ९० धावांची खेळी केली. यानंतर भारताच्या अखेरच्याा फळीतल्या फलंदाजांनी निराशाच केली. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू झॅम्पाने ४ तर हेजलवूडने ३ तर मिचेल स्टार्कने १ बळी घेतला.